breaking-newsराष्ट्रिय

शिवसेनेच्या प्रस्तावाला मोदींचा सुरुंग

नवी दिल्ली –  ‘महाराष्ट्र पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाची नवी उंची गाठेल,’ असे स्पष्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना नेतृत्वाच्या ५०-५० टक्के प्रस्तावाला अप्रत्यक्षपणे पहिला सुरुंग लावला. भाजप मुख्यालयात बोलताना मोदींनी महाराष्ट्रात फडणवीस यांचे सरकार राहील व ते पुढची पाच वर्षे राहील, असे स्पष्ट केले. ‘केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांच्या कल्याणकारी योजना लागू करण्यात महाराष्ट्रासह जेथे-जेथे भाजपची सरकारे आहेत त्या राज्यांनी आघाडी घेतली आहे. राज्य आणि केंद्राच्या योजना जनसामान्यांसाठी वेगाने काम करतात त्यातील जनतेला यापुढची पाचही वर्षे मिळत राहील,’ अशा शब्दांत मोदी यांनी महाराष्ट्रातील सरकारच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मोदींनी मुक्तकंठाने कौतुक केले. महाराष्ट्र व हरियानातील निवडणूक निकालानंतर आज सायंकाळी साडेसात वाजता भाजप मुख्यालयात पक्ष कार्यकर्त्यांसमोर पंतप्रधानांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. पक्षाध्यक्ष अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, रस्ते महामार्गमंत्री नितीन गडकरी आदींसह दिल्लीतले कार्यकर्ते उपस्थित होते .महाराष्ट्रातील निवडणुकीवर भाष्य करताना मोदी म्हणाले, ‘‘देशाची आर्थिक राजधानी व जगात देशाचा प्रभाव वाढविणारी मुंबई असलेल्या महाराष्ट्रात पन्नास वर्षांत एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे त्या पदावर राहू शकला नाही. ती संधी फडणवीस यांना मिळाली. त्याबरोबरच राज्याला पोषक असलेली राजकीय स्थिरताही प्रथमच मिळाली. यंदाच्या निवडणुकीतही महाराष्ट्राच्या जनतेने युतीला मोठ्या बहुमताने विजयी केले. फडणवीस यांच्यासारख्या युवा नेत्याने डाग न लागता सरकार चालवले. जनतेने पुन्हा जो विश्‍वास आमच्यावर दाखवला तो आशीर्वाद आम्ही पुढच्या पाच वर्षांत सार्थ करून दाखवू. मागच्या पाच वर्षांपेक्षा या राज्यात जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही अथक मेहनत घेऊ.’’

फडणवीस व मनोहरलाल खट्टर हे २०१४ पूर्वी मुख्यमंत्री नव्हे, तर मंत्रिपदाचाही अनुभव नसलेले नेते होते. मागच्या वेळेस महाराष्ट्रात भाजपला पूर्ण बहुमत नव्हते व हरियानातही फक्त दोन जागा जास्त होत्या. तरीही फडणवीस आणि खट्टर या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या भल्यासाठी अविरत परिश्रम घेतले, म्हणूनच दोघांनाही जनतेने पुन्हा आशीर्वाद दिला असेही मोदींनी सांगितले. हरियानात मागच्या निवडणुकीत भाजपला ३३ टक्के मते मिळाली होती, यंदा ती तीन टक्‍क्‍यांनी वाढून ३६ टक्‍क्‍यांवर गेली ही लोकांनी खट्टर यांच्या कामावर उमटवलेली मोहोर आहे, असे मोदी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button