breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिक्षण म्हणजेच संस्कार आणि संस्काराचे शिक्षण ही काळाची गरज – महापौर माई ढोरे

  • चॅलेंजर पब्लिक स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
  • महापौर माई ढोरे यांच्याकडून शाळेचे झाले कौतुक

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी आदर ठेवावा. शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त केल्यास विद्यार्थ्यांना पुढील जीवनात भरारी घेण्यास सोपे जाते. शिक्षण म्हणजे संस्कार आणि संस्काराचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी शाळांनी ज्ञानदानाचे महत्व पटवून देताना विद्यार्थ्यांचा स्वयंपूर्ण विकास कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आधुनिक जगात शाळांनी डिजिटल व स्वयंपूर्ण व्हावे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले.

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रविवारी (दि. २२) उत्साहात पार पडला. यावेळी महापौर माई ढोरे बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कलाविष्कार व कलागुणांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन महापौर ढोरे, शाळेचे संस्थापक आणि उद्योजक संदीप काटे यांच्या हस्ते करण्यात आले. महापौरपदी निवड झाल्याबद्दल शाळेच्या व संदीप काटे परिवाराच्या वतीने माई ढोरे यांचा तलवार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हिराबाई विठ्ठल काटे, अनिता काटे, निहारा, लीना, उद्योजक संतोष काटे, युवा नेते निलेश काटे, पालक प्रमुख अतिथी नंदू भुते, सचिन जोशी, संदीप पाटील, सौरभ सिन्हा, आंतरराष्ट्रीय एथलेटिक संदीप गायके, राहुल ठाकरे, सचिन नेने, कुमार, पुरी, डॉ. येवले, अमोल मोराळे, शाळेच्या मुख्यध्यापिका सुषमा उपाध्ये, वाकडमधील चॅलेंजर स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपिका मॅडम, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या की, व्यक्तीमत्वाचा विकास घडविणे म्हणजे शिक्षण. हे मर्म संदीप काटे व कुटुंबियांनी जाणले. पिंपळे सौदागर परिसरात चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या रूपानं शिक्षणाची गंगा अवतरली. विद्यार्थ्यांच्या मनावर आणि वाचेवर संस्कार करण्याचा प्रयत्न या शाळेतून केला जातो. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या बौध्दिक, शारिरीक आणि मानसिक व्यक्तीमत्वाचा विकास करावा. जेणेकरून ही पीढी पुढे जाऊन देशाचे सुजाण नागरिक बनतील. चॅलेंजर पब्लिक स्कूल ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून शहराचे नाव उज्ज्वल करावे. विद्यार्थ्यांनो इंग्रजी शिकाच, परंतु मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषेचा आदर करायला शिका, असा संदेश महापौर ढोरे यांनी दिला.

भविष्यातला माणूस घडविणे हेच माझे ध्येय

शाळेचे संस्थापक संदीप काटे म्हणाले, शाळेच्या स्नेहसंमेलनाचे हे सातवे वर्ष आहे. शाळेची प्रगती हीच आपली ओळख आहे. शाळेतून बाहेर पडलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कर्तबगारी दाखवून शाळेचे / संस्थेचे नाव उज्ज्वल करतील. मी आज लावलेले हे छोटेसे रोपटे उद्या वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या शाळेत कुणी गरीब आणि श्रीमंत नाही, इथे सर्व सारखेच. या सरस्वतीच्या मंदिरात विद्यार्थी द्शेतला भविष्यातला माणूस शोधून घडविणे हेच आमचे ध्येय आहे.

विद्यार्थ्यांना शाळेकडून उत्तम दर्जाचे शिक्षण मिळते

पालक प्रमुख अतिथी सचिन जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पिंपळे सौदागर परिसरातील चॅलेंजर पब्लिक स्कूल ही शाळा गुणवत्तेच्या बाबतीत आदर्श शाळा आहे. येथे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळते. त्यामुळे पालक आनंदी राहतात. अभ्यासाबरोबरच मुलांची काळजीही शिक्षक वर्गाकडून घेतली जाते.

विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून दिले सामाजिक संदेश

शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालचमूंनी हिंदी, मराठी गाण्यांवर नृत्य सादर केले. अनमोल असे हे जीवन आनंदाने व उत्साहाने जगण्यासाठी जीवन कसे जगावे ? याबाबत विविध कलाविष्कार तसेच झाडे लावा-झाडे वाचवा, बेटी बचाव-बेटी पढाव आदी सामाजिक संदेश मुलांनी दिले. देशभक्तीपर, आनंदी जीवन, धार्मिक गीतांनी परिसर रंगून गेला होता. विविधरंगी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी प्रेक्षक वर्गाची मने जिंकली.

शाळेच्या स्नेहसंमेलनानिमित्त आंतरराष्ट्रीय एथलेटिक्सपटू संदीप गायके यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेच्या रेखा सोनखेडे, वैशाली गांधी, रोशनी, प्रफुल्ला यांनी परीक्षक म्हणून तर समन्वयक म्हणून पलक गांधी यांनी काम पहिले, तर सुचिता यांनी सूत्रसंचालन केले. या क्रीडा महोत्सवात मुलांसाठी विविध प्रकारच्या मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इतर शाळांबरोबरच चॅलेंजर पब्लिक स्कूलचीच वाकड येथील शाळाही सहभागी झाली होती. यावेळी वैयक्तिक व सामूहिक क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा सरवटे यांनी केले. सीमा सरदेसाई यांनी आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button