breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘शरद पवारांनी घेतली पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची झाडाझडती’, ‘पार्थ पवारांच्या पराभवाची विचारली कारणे’

  • दस्तुरखुद्द नेते आणि पदाधिका-यांची बोलती झाली बंद
  • साहेबांसमोर मानहानी करून घेण्याची ओढवली नामुष्की

– अमोल शित्रे

पिंपरी, (महाईन्यूज) – लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून उमेदवार पार्थ पवार यांचा झालेला पराभव आणि पिंपरी-चिंचवडमधून त्यांना मिळालेले  अत्यल्प मतदान, या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे नेते आणि पदाधिकारी यांची आज झाडाझडती घेतली. साहेब आणि दादांची कर्मभूमी असणा-या पिंपरी आणि चिंचवड मतदार संघातून अत्यंत लाजीरवाणे मतदान होण्याची कारणे साहेबांनी विचारताच शहरातील नेते, पदाधिका-यांवर खाली मान घालण्याची वेळ आली. साहेबांनी त्यांच्यावर प्रश्नांनी सरबत्ती केल्याने भल्याभल्यांची बोलती बंद झाल्याची माहिती समजते.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शहरातील नेते आणि पदाधिका-यांची मुंबईत आज आढावा बैठक झाली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगण भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, आमदार दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवडमधून पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील 70 ते 80 पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून झालेल्या पार्थ पवार यांच्या पराभवाची कारण मिमांसा करण्यात आली. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि साहेब आणि दादांची कर्मभूमी असलेल्या पिंपरी आणि चिंचवड मतदार संघातून पार्थ पवार यांना अत्यल्प मतदान झाल्याची कारणे देण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले. त्याला अनुसरून शहरातील पदाधिका-यांनी आपले मनोगत व्यक्त केले. साहेबांच्या समोरच कारणे देण्याची वेळ आल्याने स्वतःला नेते मानणा-यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे समजते. आपापल्या पध्दतीने पदाधिका-यांकडून उत्तरे ठोकण्याचा सोपस्कार झाला. परंतु, त्यावर साहेब समाधानी झाल्याचे दिसून येत नसल्याची माहिती समजली. खासगीत सुध्दा प्रश्नांची सरबद्दी सुरूच राहिल्याने भल्याभल्यांची बोलती बंद झाल्याचे समजते.

पदाधिका-यांवर अजित दादांची नाराजी?

कधीकाळचे पिंपरी-चिंचवडचे कारभारी आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीला अनुपस्थिती लावली. त्यामुळे बैठकीत दादांच्या अनुपस्थितीची चर्चा जोरात होती. दादांची अनुपस्थिती बोलकी ठरली. दादांच्या बैठकीला हजेरी न लावण्यावरून पिंपरी-चिंचवडमधील पक्षाचे नेते आणि पदाधिका-यांवर त्यांचा तिव्र रोष असल्याचे दिसते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दादांची मर्जी राखताना सर्वांची त्रेधातिरपीट उडणार, यात शंका नाही. मुळात दादा समजून घेतील का नाही, असा प्रश्न विधानसभेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून मिरवणा-यांना चिंतेचा विषय झाला आहे.

योगेश बहल, मंगला कदम यांची दांडी

राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार कोण हाकत होतं, असा प्रश्न केला, तर त्याचे उत्तर राजकीय पदाधिकारी अथवा माजी होऊन बसलेल्या पदाधिका-यांना सांगण्याची गरज नाही. अजितदादांनी मोठ्या विश्वासाने योगेश बहल आणि मंगला कदम यांना शहराचे महापौर पद दिले. दरम्यान, दादांना गाववाल्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. परंतु, ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आज मुंबईतील बैठकीला दांडी मारल्याची माहिती समजते. अनुपस्थितीचे कारण काय सांगावे म्हणून प्रदेशनेतृत्वाला महापालिकेच्या विशेष महासभेचे कारणही सांगण्यात आले असावे. परंतु, बहल हे सभेला देखील उपस्थित नव्हते. मात्र, मंगला कदम महासभेत उपस्थित होत्या. त्यामुळे त्यांना जाणे शक्य झाले नसेल कदाचित.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button