breaking-newsमहाराष्ट्र

रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती-उदयनराजे

नीरेच्या पाण्यावरून रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोघांमधला वाद चांगलाच पेटला आहे. रामराजे यांनी केलेली टीकेला राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. रामराजे वयाने मोठे आहेत म्हणून मी शांत आहे माझ्या वयाचे असते तर जे काही बोलले त्याबद्दल जीभ हासडली असती अशा आक्रमक भाषेत  उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बारामतीकडे वळवलेल्या नीरा देवघरच्या पाण्यावरून दोन राजघरण्यांमध्ये संघर्ष सुरू झालेला दिसला तो आता शिगेला पोहचला आहे. पिसाळलेली कुत्री जोपर्यंत असतील तोपर्यंत मी पिसाळलेलाच राहणार अशी टीका राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांनी केली होती. याबाबत उदयनराजे भोसले यांनी उत्तर देत रामराजे माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असं उदयनराजेंनी म्हटलं आहे. या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला खरा मात्र तो अपयशी ठरला कारण त्या बैठकीतून उदयनराजे भोसले बाहेर पडले आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी तीव्र शब्दात त्यांचा संताप व्यक्त केला.

माझी तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी रामराजेंनी केली. त्यांच्यासारख्या मोठ्या माणसाला हे बोलणं शोभतं का? मी पिसाळतो असं ते म्हणतात. होय ते लोकांची कामं झाली नाहीत तर मला राग येतोच. मी कधीही कोणाचं वाईट चिंतलेलं नाही. तरीही ते म्हणतात मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतोच. रामराजेंनी एक लक्षात ठेवावं मी काही बांगड्या भरलेल्या नाहीत उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं कुणीही करू नये. कुपोषित मुलासारखं वागू नये वेळ पडली तर जशास तसं उत्तर आम्हालाही देता येतं. पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत. मी काय बोललो ते एकदा सगळ्यांना विचारा. रामराजे जर माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात दिली असती असा इशाराच उदयनराजेंनी दिला.

काय आहे वाद?
नीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी रामराजेंचं नाव न घेता टीका केली होती. स्वार्थासाठी १४ वर्षे बारामतीला पाणी वळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केला होता.

दरम्यान उदयनराजेंवर ३०२ चे गुन्हे दाखल आहेत असं म्हणत रामराजेंनी उदयनराजेंवर पलटवार केला होता. एवढंच नाही तर सगळी संस्थानं खालसा झाली आहेत. संस्थानंच खालसा झाली तर नावापुढे छत्रपती कुणी लावतं का? असाही प्रश्न रामराजेंनी विचारला होता. रामराजे यांच्या सगळ्या टीकेला उदयनराजेंनी त्यांच्या आक्रमक शैलीत उत्तर दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button