breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विशेष मतदार नोंदणीत साडेनऊ हजार अर्ज

येत्या रविवारीही नोंदणी करण्याची संधी

जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार २१ ऑक्टोबर रोजी झालेल्या मोहिमेअंतर्गत शहरासह जिल्ह्य़ातील सर्व विधानसभा मतदारसंघांतून मिळून नऊ हजार ९६३ अर्ज दाखल झाले. यापैकी मतदार नोंदणीसाठीचे अर्ज सात हजार ८७७ आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पुणे जिल्ह्य़ाची प्रारूप मतदार यादी एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर हरकती, सूचना नोंदवण्यासाठी ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत आहे. २१ ऑक्टोबरला सात हजार ८७७ अर्ज आले. त्यामध्ये १८ ते १९ वयोगटातील दोन हजार ७५८ तरुणांनी अर्ज दिले असून एकोणीस वयोगटापेक्षा अधिक असणाऱ्या मतदारांचे पाच हजार ११९ अर्ज अाहेत.

मतदार यादीतील नाव, पत्त्यांमधील दुरुस्ती, मयत दुबार नावे वगळणे आदींसाठी दोन हजार ५७२ नागरिकांनी अर्ज केले आहेत. या मोहिमेअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत उपस्थित राहून संबंधित नागरिकांना अर्जाचे वाटप करून भरून आलेले अर्ज जमा करून घेतले जाणार आहेत, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.

अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेकडून ऑक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याची योजना आहे.

त्यानुसार आतापर्यंत सात, चौदा आणि एकवीस ऑक्टोबरला विशेष मतदार नोंदणी राबविण्यात आली. येत्या रविवारी (२८ ऑक्टोबर) विशेष मोहिमेअंतर्गत नागरिकांना नाव नोंदवण्यासाठी संधी मिळणार आहे. ही नोंदणी मतदान केंद्रांवर जाऊन करता येईल.

संकुलांच्या कामगिरीचा साप्ताहिक आढावा

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम शहरासह जिल्ह्य़ात राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत मतदारांची नोंदणी, दुरुस्ती, दुबार व मयत नावे वगळणे अशा कामासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थांकडून आलेल्या यादीनुसार मतदार यादी अद्ययावत झाली किंवा कसे याबाबत दर आठवडय़ाला आढावा घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

सहकारी गृहनिर्माण संस्थांचा निवडणूकविषयक कामात सहभाग घेण्यासाठी बैठक  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राम यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम शहरासह जिल्ह्य़ात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत मतदारांची नोंदणी, दुरुस्ती, दुबार व मयत नावे वगळणे याबाबत कार्यवाही सुरू आहे. गृहनिर्माण संस्थांची निवडणूकविषयक कामकाजात मदत होण्यासाठी आणि सोसायटय़ांमधील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी संबंधित संस्थांचे अध्यक्ष, सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशाप्रकारचा अभिनव उपक्रम प्रथमच राबवला जात आहे. गृहनिर्माण संस्थेतील नवीन मतदारांची नावनोंदणी करण्यासाठी आणि संस्थेतील मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी आणि मतदार यादीतील सध्याची नावे, पत्ता, छायाचित्रांमधील दुरुस्ती यासाठी या स्वयंसेवकांची मदत महत्त्वाची ठरणार आहे, असे राम यांनी सांगितले.

‘मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील महत्त्वाच्या भागात बैठका घेण्यात येणार आहेत. शहरात १६ हजार ३६० गृहनिर्माण संस्था असून सहा उपनिबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयांच्या क्षेत्रातील मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रयत्न केले जातील ,’ असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button