breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

…तर महाबळेश्वर असेल जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण

मुंबई |

महाराष्ट्राला सातत्याने या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते आहे, याची इशाराघंटा २००७ मध्येच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल फॉर क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालात वाजलेली होती. मात्र आपण गेली १४ वर्षे सातत्याने दुर्लक्ष करत आहोत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. रेमंड दुराईस्वामी गेली काही वर्षे सातत्याने याकडे लक्ष वेधत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जर या अहवालाप्रमाणे वातावरण बदल झाले तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल.

आयपीसीसीच्या अहवालात पावसाच्या असमान वितरणाकडे नेमके लक्ष २००७ सालीच वेधण्यात आले होते. हा अहवाल खरेतर २०५० साली नेमकी काय अवस्था असेल याकडे लक्ष वेधण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र त्यामध्ये देण्यात आलेले इशारे गेल्या १० वर्षांमध्येच प्रत्यक्षात येण्यास सुरुवात झालेली दिसते, असे सांगून डॉ. दुराईस्वामी सांगतात, त्यासाठी तापमानातील विविध बदल- अनियमितता आणि इतर निकषांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार भविष्यातील तापमान वाढ तसेच पावसाचे असमान वितरण, त्याच्या वाढणाऱ्या तीव्रता आणि न पडण्याचे वाढते प्रमाण याचे नकाशेच तयार करण्यात आले असून ते जगभर सादर झाले आहेत. यात नवे काहीही नाही. उत्तर ध्रुवावरील तापमानवाढीमुळे बर्फाचे वितळणे ही सर्वात मोठी घटना असणार आहे.

  • महाबळेश्वर जगातील सर्वाधिक पाऊस पडणार ठिकाण

भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.

  • डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी आवश्यक…

भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे. आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button