breaking-newsक्रिडा

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा: विदर्भाची महाराष्ट्रावर सनसनाटी मात

बंगळुरू- गोलंदाजांची प्रभावी कामगिरी, तसेच अक्षय वाडकर आणि दर्शन नळकांडे यांच्या झंझावाती भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राचा 3 गडी व 4 चेंडू राखून पराभव करताना विदर्भ संघाने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सनसनाटी निकालाची नोंद केली. महाराष्ट्राचा हा पहिलाच पराभव ठरला. महाराष्ट्राने याआधी बडोदा, रेल्वे, हिमाचल प्रदेश, कर्नाटक व गोवा या संघांना पराभूत केले होते.

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्र संघाला निर्धारित 50 षटकांत 8 बाद 201 धावांवर रोखताना विदर्भाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी फलंदाजांच्या अपयशाची भरपाई करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु विदर्भाने 49.2 षटकांत 7 बाद 206 धावा फटकावून खळबळजनक विजयाची नोंद केली.
विजयासाठी 202 धावांच्या माफक आव्हानासमोर पहिल्या चारही फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही व विदर्भाची लवकरच 4 बाद 29 आणि 5 बाद 48 अशी घसरगुंडी झाली. अखेर अक्षय वाडकरने झुंजार अर्धशतकी खेळी करताना ऋषभ राठोडच्या (20) साथीत 52 धावांची भागीदारी करीत विदर्भाचा डाव सावरला. राहुल त्रिपाठीने राठोडला धावबाद करीत ही जोडी फोडली. परंतु अक्षयने दर्शन नळकांडेच्या साथीत 9 षटकांत 83 धावांची अखंडित भागीदारी करीत विदर्भाला विजयी केले. अक्षयने 120 चेंडूंत 4 चौकारांसह नाबाद 82 धावा केल्या. तर दर्शन नळकांडेने केवळ 30 चेंडूंत 1 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 53 धावा फटकावून विदर्भाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याआधी ऋतुराज गायकवाड व जय पांडे यांनी महाराष्ट्राला 13.3 षटकांत 56 धावांची सलामी दिली. ऋतुराजने 45 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह 32 धावा केल्या. तर जय पांडेने 53 चेंडूंत 4 चौकारांसह 28 धावांची खेळी केली. हे दोघे परतल्यावर राहुल त्रिपाठी (9) फार काळ टिकला नाही. परंतु अंकित बावणेने 102 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 62 धावांची खेळी करताना महाराष्ट्राचा डाव सावरला.

अंकित बावणेने नौशाद शेखच्या साथीत चौथ्या गड्यासाठी 33 धावांची आणि रोहित मोटवानीच्या साथीत पाचव्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी करीत नौशाद शेख (19) आणि रोहित मोटवानी (28) यांच्या उपयुक्‍त खेळीमुळे महाराष्ट्राला 201 धावांची मजल मारता आली. विदर्भाकडून आदित्य सरवटे, दर्शन नळकांडे व रामास्वामी संजय यांनी प्रत्येकी दोन बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली.

संक्षिप्त धावफलक-
महाराष्ट्र- 50 षटकांत 8 बाद 201 (अंकित बावणे 62, ऋतुराज गायकवाड 32, जय पांडे 28, रोहित मोटवानी 28, नौशाद शेख 19, रामास्वामी संजय 20-2, दर्शन नळकांडे 26-2, आदित्य सरवटे 41-2) पराभूत विरुद्ध विदर्भ- 49.2 षटकांत 7 बाद 206 (अक्षय वाडकर नाबाद 82, दर्शन नळकांडे नाबाद 53, ऋषभ राठोड 20, समद फल्लाह 33-2, अनुपम सांकलेचा 33-1).

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button