breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

‘वायसीएम’चा गलथान कारभार चव्हाट्यावर, कोरोनाबाधीत रुग्णाला चक्क उपचार नाकारले

  • दवाखान्याच्या शोधात रात्री दीड वाजेपर्यंत रुग्ण शहरभर भटकला
  • कोरोनाचा संसर्ग वाढीला पालिका प्रशासनच ठरतेय जबाबदार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कोरोना ‘पॉझीटिव्ह’ रुग्णाला चक्क 9 तास उपचार मिळाले नाहीत. ‘वायसीएम’ रुग्णालयात घेण्यास नकार दिल्यानंतर बाधित रुग्णाला रिक्षा आणि खासगी वाहनांतून प्रवास करत पिंपरीतील एका प्रायव्हेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले. दरम्यान, संपर्कात आलेल्या व्यक्तींना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हातातून शहरावरील कंट्रोल निसटत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. परिणामी कोरोनाबाधीत रुग्णवाढीला महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील प्रशासन जबाबदार ठरत आहे.

चार दिवसांपूर्वी वाल्हेकरवाडी येथील कोरनाबाधित रुग्णाला ‘वायसीएम’मध्ये तपासण्यात आले. त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असून प्रकृती स्थिर असल्याचे सांगून त्यांना बालेवाडी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, चार दिवस उलटल्यानंतर प्रकृती खूपच खालावत चालल्याचे त्यांना वाटू लागले. त्यांनी तेथील स्टाफच्या संम्मतीने वैद्यकीय उपचार घेण्याची मागणी केली. त्यावर त्यांना ‘वायसीएम’ रुग्णालयात उपचार घेण्याची संम्मती देण्यात आली. संबंधीत व्यक्ती काल रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेचार वाजता वायसीएम रुग्णालयात दाखल झाले. तेथील प्रशासनाशी संपर्क साधून त्यांनी उपचार घेण्यासाठी दाखल करून घेण्याची विनंती केली. परंतु, त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. काही वेळानंतर त्यांना ”तुम्हाला थांबावे लागेल”, असे सांगण्यात आले. साडेचार ते साडेसहापर्यंत त्यांना ‘वायसीएम’ रुग्णालयाच्या बाहेर वाट पाहत थांबावे लागले. त्यानंतर चौकशी केली असता बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

ब प्रभागाचे स्विकृत सदस्य बिभीषण चौधरी यांनी साडेसहाच्या नंतर कोरोनाबाधीत रुग्णासाठी खासगी रुग्णालयात बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी काही डॉक्टरांना मोबाईलद्वारे संपर्क साधून विनंती केली. परंतु, त्यांना ऑक्सिजन उपलब्ध नसल्याची उत्तरे मिळाली. त्यानंतर त्यांनी पॉझीटिव्ह रुग्णाला रिक्षातून काळेवाडी येथील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याठिकाणीही तांत्रीक कारणे सांगून टाळाटाळ करण्यात आली. शेवटी चौधरी यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्वीयसहायकाशी संपर्क साधला. त्यांनी तत्काळ चौकशी करून पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधीत रुग्णासाठी बेड उपलब्ध करून दिला. रात्री दीड वाजता बाधित रुग्णाला उपचार मिळाले. तोपर्यंत हा रुग्ण त्यांच्या घरच्यांच्या संपर्कात आला होता. त्यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता बळावत आहे. त्यांची टेस्ट करून घेणे उचित ठरणार आहे.

पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

आपल्या मागण्या मांडण्यासाठी वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी आंदोलन करतात. मात्र, त्यांच्या कामातील प्रामाणिकपणावर संशय निर्माण होतो आहे. कोरोनाबाधीत रुग्णांना चक्क उपचार नाकारणे योग्य नाही. एकीकडे आयुक्त शहरातील संबंध नागरिकांना सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईनचे उपदेश देतात आणि दुसरीकडे वैद्यकीय विभागातील डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी असा खेळ खेळतात. त्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास उडत चालल्याचे चित्र दिसत आहे. तसेच, क्वारंटाऊन सेंटर उभारणे, रुग्णांची भोजन व्यवस्था, सॅनिटायझर, मास्क यासह तत्सम उपकरने, साहित्य खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये सढळ हाताने खर्च केले जातात. मात्र, ज्या करदात्यांच्या पैशातून ही खरेदी केली जाते. त्याच करदात्यांना वायसीएम आणि पालिकेच्या अन्य रुग्णालयात उपचार नाकारले जातात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यामुळे पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button