breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘वरिष्ठ अधिका-यांची’ मुले बनली महापालिकेचे ठेकेदार?; पण कुटूंबाच्या ‘व्यवसायाची’ प्रशासनाकडे नाही ‘माहिती’

आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल राॅय यांच्या पत्राबाबत प्रशासनाकडे नाही उत्तर

विकास शिंदे

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

“श्रीमंत’ बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कोट्याधिश आहेत. त्या अधिकाऱ्यांना दरवर्षी स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण पत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची आणि कुटूंबियांची मालकी असलेली स्थावर व जंगम मालमत्ता दडविली आहे. महापालिकेच्या वर्ग 1 ते 3 मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण मालमत्ता किती? याचा अंदाज महापालिका भवनासमोर लावलेल्या महागड्या गाड्यावरुनच सर्वसामान्य बांधत आहेत. दरम्यान, प्रशासनाकडे अधिका-यांच्या कुटूंबातील पत्नी, मुलांचा व्यापार किंवा धंदा करणा-या कोणत्याही व्यक्तीच्या माहितीचा अभिलेखच उपलब्ध नसल्याची बाब उघडकीस आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यासाठी शासनाकडील अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच लागलेली असते. शासनाकडून प्रतिनियुक्‍तीवर आलेल्या अनेक अधिका-यांचा कार्यकाळ पुर्ण होवूनही ते महापालिका सोडून जाण्यास तयार नाहीत. त्याचबरोबर महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचा-यांची बदली केल्यास देखील लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप करुन पुर्वीच्याच ठिकाणी नियुक्‍ती करावी, असा हट्ट करत असतात. त्यामुळे स्थापत्य, बांधकाम, मध्यवर्ती भांडार, वैद्यकीय भांडार, नगररचना, प्रशासन, आरोग्य, वैद्यकीय, पाणी पुरवठा, शिक्षण, विद्युत, पर्यावरण आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाऊन “तुम्ही पण जगा अन्‌ आम्हालाही जगू द्या’, असा पवित्रा घेतला आहे.

महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या वर्ग 1 ते 3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. हे विवरणपत्र त्या-त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे सादर करावे लागते. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत “झोपेचे सोंग’ घेतले आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उद्योग, व्यवसाय आहेत. काहींनी कुटुंबियांच्या नावावर कंत्राटे घेतली आहेत. काही अधिकाऱ्यांची वाहने, घरे व इतर डामडौल पाहता त्यांच्या “श्रीमंती’चा अंदाज येईल. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचे वाढदिवस, लग्न सोहळे एखाद्या राजकीय पुढाऱ्याला लाजवेल,असे आहेत. मागील दोन वर्षांपासून अनेकांनी मालमत्ता विवरणपत्र सादर केले नसल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व  कर्मचारी यांच्या कुटुंबातील (प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसहित) व्यापार किंवा धंदा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची माहिती अशा अधिकारी, कर्मचा-यामार्फत  पालिकेस कळविण्यात आलेली आहे. त्या सर्व कागदपत्रांचा तपशील व त्यासंबंधीची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी माहिती अधिकारात मागविली आहे. याबाबत महापालिका अधिकारी व प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिका-यांच्या कुटूंबातील पत्नी, मुलगा यांचा व्यापार, धंदा करणा-या कोणत्याही व्यक्तीचा अभिलेख प्रशासनात उपलब्ध नाहीत. असं प्रशासनातील एका वरिष्ठ अधिका-यांने सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button