breaking-newsआंतरराष्टीय

लिबीयामध्ये तुरुंगातून 400 कैद्यांचे पलायन

त्रिपोली (लिबीया) – लिबीयाची राजधानी त्रिपोलीमध्ये एका तुरुंगात झालेल्या जोरदार संघर्षानंतर सुमारे 400 कैदी पळून गेले आहेत. दहशतवाद्यांनी तुरुंगावर केलेल्या जोरदार हल्ल्यानंतर कैद्यांनी तुरुंगाचे दरवाजे उघडून पलायन केले, असे पोलिसांनी सांगितले.

ईन झारा येथील तुरुंगात हा प्रकार घडला. पळून गेलेल्या कैद्यांनी कोणते गुन्हे केले होते, हे मात्र पोलिसांनी सांगितले नाही. तुरुंगाच्या सुरक्षा रक्षकांना धमकावून दरवाजे बळजबरीने उघडण्यात आले होते. मात्र सुरक्षा रक्षक जीवाच्या भीतीने या कैद्यांना प्रतिकार करू शकले नाहीत, असेही पोलिसांनी सांगितले.

या तुरुंगातील बहुतेक कैदी सामूहिक गुन्हेगारीमध्ये सामील होते. माजी हुकुमशहा गद्दाफी यांचे कित्येक सहकारीही याच तुरुंगात ठेवलेले होते. 2011 साली झालेल्या बंडादरम्यानच्या सामूहिक हत्याकांडाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. गेल्या आठवड्याभरापासून त्रिपोलीमध्ये झालेल्या हिंसाचारात 39 जण ठार आणि 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

रविवारी त्रिपोलीतील शरणार्थ्यांच्या छावणीवर रॉकेट हल्ला झाला. या छावणीमध्ये गद्दाफी यांचे शेकडो समर्थक रहात होते. शुक्रवारी त्रिपोलीवर एकूण 23 रॉकेट डागण्यात आली. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभुमीवर लिबीयामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button