breaking-newsपुणे

रेल्वेत लाखांहून अधिक फुकटे प्रवासी!

  • पुणे विभागाची नऊ महिन्यांतील कारवाई

रेल्वेच्या उपनगरीय किंवा पॅसेंजर गाडय़ांमध्ये तिकीट तपासनिसाला चकवून तिकीट न काढताच प्रवास करण्याचा ‘उद्योग’ करणारी मंडळी कमी होण्याची चिन्हे नाहीत. रेल्वेच्या उत्पन्नाला त्याचा फटका बसत असल्याने फुकटय़ा प्रवाशांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या पुणे विभागामध्ये मागील नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये तिकीट तपासनिसांच्या जाळ्यामध्ये तब्बल एक लाख १३ हजार फुकटे प्रवासी सापडले आहेत. त्यांच्याकडून ६ कोटी २४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

पुणे रेल्वेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे-मळवली या मार्गावर पुणे- लोणावळा उपनगरीय गाडय़ांची सुविधा देण्यात येते. पुणे- बारामती, पुणे- मिरज, मिरज- कोल्हापूर या मार्गावर डेमू, पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाडय़ा धावतात. पुणे- लोणावळा मार्गावरील लोकल गाडय़ांमध्ये प्रामुख्याने मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी आढळून येत असतात. पूर्वी या गाडय़ांमध्ये दररोजच तिकीट तपासनिसांच्या माध्यमातून प्रवाशांकडून तिकिटांची तपासणी केली जात होती. मात्र, लांबपल्ल्याच्या आणि इतर गाडय़ांची वाढती संख्या लक्षात घेता तिकीट तपासनिसांची संख्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उपनगरीय, पॅसेंजर गाडय़ांमध्ये वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात येते. त्याचप्रमाणे स्थानकांवरही तिकिटांची तपासणी केली जाते. त्यात मोठय़ा प्रमाणावर फुकटे प्रवासी सापडत असल्याचे वास्तव आहे.

रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील विविध मार्गावर एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत तिकीट तपासणीची व्यापक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये तब्बल अडीच लाख प्रवाशांना पकडण्यात आले. त्यात तिकीटच न घेतलेले १ लाख १३ हजार प्रवासी होते. पकडलेले इतर प्रवासी योग्य तिकीट न काढणारे, त्याचप्रमाणे शुल्क न देता निश्चित वजनापेक्षा अधिक वजनाच्या साहित्याची वाहतूक करणारे होते. सर्वाकडून मिळून तब्बल १२ कोटी २० लाख रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. गेल्या वर्षांत याच कालावधीमध्ये एकूण २ लाख १४ हजार प्रकरणांमध्ये ११ कोटी वीस लाखांच्या दंडाची वसुली करण्यात आली होती. यंदा तिकीट तपासनिसांनी कारवाई केलेल्या प्रकरणांमध्ये सुमारे ३५ हजार प्रकरणांची वाढ झाली असून, दंडाच्या रकमेतही एक कोटींनी वाढ झाल्याचे दिसून आले. पुणे रेल्वेचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकीट तपासनीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मतदीने ही कारवाई करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button