breaking-newsपुणे

संशोधकांकडून बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध

  • ‘फेजेर्वर्या मराठी’ असे नामकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांना बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या क्रिकेट फ्रॉगच्या प्रजातीतील या नव्या प्रजातीचे ‘फेजेर्वर्या मराठी’ असे नामकरण करण्यात आले.

नव्या प्रजातीच्या शोधाविषयीचे संशोधन ‘झुटेक्सा’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागाचे संशोधक डॉ. समाधान फुगे, कल्याणी भाकरे, रामनाथ आंधळे, प्रा. आर. एस. पंडित यांनी झुलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाचे  डॉ. के. पी. दिनेश यांच्या सहकार्याने इंटिग्रेटेड टॉक्सोनॉमिक अ‍ॅप्रोचचा (ध्वनिशास्त्र, आकारशास्त्र, डीएनए बारकोडिंग) वापर केला. नवी प्रजाती केवळ महाराष्ट्रात आढळत असल्याने त्याला मराठी नाव देण्यात आले. नवीन प्रजातीचा बेडूक पुणे जिल्ह्य़ातील ताम्हिणी, लोणावळा घाट परिसरात, तसेच रायगड आणि नगर जिल्ह्य़ातील काही भागात सापडू शकतो.

प्राथमिक अभ्यासानुसार असे आढळून आले, की मराठी फेजेर्वर्या बेडकाचे प्रजनन मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात होते. नर बेडूक आपल्या गळ्याखाली असलेल्या ध्वनिउत्पादक पिशवीतून आवाज उत्पन्न करतो. सर्वसाधारणपणे नर बेडूक पाणवठय़ाजवळ बसून आवाज करतो. तो या प्रजातीसाठी वैशिष्टय़पूर्ण आहे. या आवाजांचा उपयोग अधिक संशोधनासाठी होईल. झुलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियातील प्राणी वर्गीकरण तज्ज्ञांच्या मतानुसार पश्चिम घाटाची रचना आणि हवामानामुळे आणखी प्रजातींचा शोध लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे. नवीन प्रजाती ही पश्चिम घाटातील क्रिकेट फ्रॉग वर्गातील सर्वात जुना वंश आहे.

१०० वर्षांनी शोध

‘फेजेर्वर्या मराठी’ या बेडकाच्या प्रजातीचा शोध ही महत्त्वपूर्ण घटना आहे, कारण या वर्गातील आधीच्या शोधानंतर (फेजेर्वर्य सह्य़ाद्रेन्सिस) सुमारे १०० वर्षांनी पुण्यातून या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button