breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्ण वाढले, पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाउनची गरज : नगरसेविकास सीमा सावळे

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आजवर अत्यंत चांगले काम केले. त्याचा परिणाम शहरात कोरोना नियंत्रणात राहिला होता. राज्यातील मुंबई, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव अशा काही शहरांतील कोरोना रुग्ण, मृतांची संख्या असा सारासार विचार केला असता पिंपरी चिंचवड शहरात महापालिका प्रशासनाने परिस्थिती व्यवस्थित हाताळली हे मान्य करावेच लागेल. त्यात दुमत असलण्याचे कारण नाही. मात्र, गेल्या लॉकडाऊन खुला केल्यापासून गेल्या पंधरा दिवसांत परिस्थिती झपाट्याने बदलताना दिसते आहे. जिथे रोज कसेबसे ९-१० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते तिथे गेल्या आठवड्यात ४०-५० ची वाढ होत होती. लोकांचा संपर्क वाढत चालला आणि तोच रेश्यो आता ६० – ७० पर्यंत आला आहे.  अवघ्या पंधरा दिवसांत जवळपास ७०० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात वाढले आहेत. ही धोक्याची घंटा आहे व  परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर व्हावे, मोठा धोका टाळण्यासाठी पिंपरी चिंचवडला पुन्हा काही काळासाठी लॉकडाऊन करावे, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सिमा सावळे यांनी म्हंटले आहे आहे कि,  देशभर कोरोनाचा प्रसार होत होता, अगदी मुंबईतील धारावी झोपडपट्टीत कहर माजला होता, तरी सुध्दा पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीत एकही रुग्ण दिसत नव्हता. आज परिस्थिती एकदम बदलली आहे. बहुतांश झोपडपट्ट्यांतून कोरोनाचे जास्तीत जास्त रुग्ण सापडतात. आनंदनगर, अजंठानगर हे त्याचे ढळढळीत उदाहारण आहे. आता कोरोना झोपडपट्टीत हातपाय पसरतो आहे. ही परिस्थिती हाताळणे कठीण काम आहे. कारण गोरगरीबांचे हातावरचे पोट आहे. त्यांना काम केले तर चूल पेटते अशी स्थिती आहे. आता त्या भागात रुग्ण सापडला की आपण तो परिसर सील करतो. त्या परिसरातील नागरिकांना होम क्वारंटाईन करतो. मात्र गोरगरिबाची झोपडी जेमतेम १० बाय १० ची असते. त्यात ती पत्र्याची आणि गल्लीबोळात कोंदट वातावरणात असते. त्यामुळे क्वारंटाईनचा प्रयोग फसतो आहे. आज किमान ५० टक्के रुग्ण हे झोपडपट्टीतील आहेत. त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. झोपडपट्टीकडे थोडे अधिक लक्ष देण्याची नितंता गरज आहे. तसेच घरोघरी किमान १०-१५ दर्जेदार मास्क, १०० मिलीच्या दोन सॅनिटायझर बाटल्या, हात धुण्यासाठी लाईफबॉय साबणाच्या किमान ५ वड्यांचे वाटप करावे. कन्टेनमेंट झोनमध्ये मनपाच्या वतीने खिचडी वाटप करण्यात येते. मात्र दररोज खिचडी खाणे शक्य नाही व खिचडीचा दर्जा देखील अत्यंत सुमार आहे. त्यामुळे परिसर सील करताना त्या भागातील लोकांना  किमान एक महिन्याचा किराणा साहित्य दिले पाहिजे. सर्व झोप़डपट्ट्यांतील शौचालये दिवसातून चार वेळा स्वस्छ करून सॅनिटाईझ करण्यात यावे. नागरिकांना विश्वासात घेऊनच हे तातडीने होण्याची नितांत गरज आहे. अन्यथा झोपडपट्टीतून प्रसार रोखणे कठीण आहे. तसे झाले तर पिंपरी चिंचवडचा कडेलोट होईल. त्यासाठी प्रशासनाने पुन्हा नव्या दमाने विविध कंपन्यांतून सीएसआर फंडाची मदत घ्यावी, दानशूर व्यक्तींना मदतीला घ्यावे, पण झोपडपट्टीकडे अगदी प्राधान्याने लक्ष पुरवावे ही कळकळीची विनंती, सावळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सावळे यांनी निवेदनात  लॉकडाऊन शिथिल करताना लागू करताना लागू केलेल्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. लॉकडाऊन खुला केल्या पासून बाजारपेठेतील गर्दी वाढली आहे. किराणा, भाजी मंडई, चिकन, मटन शॉप, वाईन शॉप पुढे सोशल डीस्टेन्सिंगच्या नियमांनुसार नुसार लाईन नसते, तर नेहमी सारखी गर्दी असते. शहरातील हे चित्र धोकादायक वाटते. दुचाकीवर एकच व्यक्तीला परवानगी असताना दोन-तीन लोक बसून राजरोस प्रवास करतात. चार चाकीत दोन व्यक्तींना परवानगी असताना मागे तीन, पुढे दोन बसतात. रिक्षांमध्ये दोन व्यक्तींना बसण्याचा नियम आहे, पण पाच-सहा कोंबून बसलेले असतात.  बँकांतून, एटीएम सेंटरमध्येही गर्दी असते. फुगवाडीतील चहाच्या दुकानासमोर किमान १००-१५० लोक एकत्र चहा पिताना दिसतात. सर्व नियम धाब्यानर बसवले आहेत. शहरात असेच सार्वत्रिक चित्र पहायला मिळते आहे. सोशल डिस्टन्सिंगचा पार सत्यानाश झाला आहे.  मास्क न घालणाऱ्यांना २०० रुपये दंड आहे, पण कुठेही कारवाई होताना दिसत नाही. रस्त्यात थुंकणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड आहे. त्यातून कोरोनाचा प्रसार होण्यास मोठी मदत होते आहे. अमेरिकेच्या सरकारने एक अहवाल दिला आहे, त्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय सांगताना लॉकडाऊन खुला केल्याने काय दुष्परिणाम झालेत त्याचे विवेचन आहे. संपर्क अधिक आल्यास कोरोनाचा सर्वाधिक फैलाव होतो असे त्यांचे निष्कर्ष आहेत. हे टाळायचे असेल, संभाव्य उद्रेक नको असेल तर किमान पिंपरी चिंचवड शहर पुन्हा एकदा काही काळासाठी पहिल्यासारखे सील करा.  किमान दहा दिवसांसाठी तत्काळ लॉकडाऊन करा, अशी मागणी सावळे यांनी केली आहे. अन्यथा आगामी काळात म्हणजे जून अखेर ३ हजार नाही तर अधिक असेल, असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. कम्युनिटी स्प्रेड होतो आहे, हे लक्षात घेऊन तत्काळ निर्णय घ्यावा, अशी कळकळीची विनंती सावळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button