breaking-newsआंतरराष्टीयमहाराष्ट्रमुंबई

सार्वजनिक खासगी तत्त्वावर ‘एमडीआर’ रुग्णांना उपचार

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हिंदुजा रुग्णालयात आजपासून उपक्रमास प्रारंभ   

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगाची (एमडीआर) बाधा झालेल्या रुग्णांना आता माहीम येथील पी.डी.हिंदुजा रुग्णालयात सार्वजनिक खासगी तत्त्वावर उपचार घेता येणार आहेत. महापालिकेच्या पुढाकाराने २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनापासून ही सुविधा उपलब्ध करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे. यामध्ये रुग्णांना औषधे मोफत दिली जातील.

मुंबईत क्षयरोगाने गंभीर स्वरूप धारण केले असून एमडीआर रुग्णांची संख्या सुमारे पाच हजारावर पोहचली आहे. भारतात ४० टक्के एमडीआर रुग्णांचे निदान वेळेत केले जाते. यातील केवळ २५ टक्के रुग्णांना उपचार मिळत आहेत. यामधील दोन तृतीयांश रुग्ण हे खासगी दवाखान्यात उपचार घेतात. मात्र खासगी दवाखान्यामध्ये योग्य पद्धतीने उपचार मिळत नाहीत, शिवाय रुग्णांचा योग्यरीतीने पाठपुरावा केला जात नसल्याने औषधांना प्रतिरोध करणारा क्षयरोग वाढत आहे.

एमडीआर रुग्णांचे वेळेत निदान होऊन वेळेत उपचार सुरू व्हावेत, यासाठी ही सुविधा सुरू करण्यात येत आहे. डॉ. झरीर उदवाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या केंद्रामध्ये औषधे मोफत दिली जाणार आहेत. तसेच रुग्णाच्या चाचण्यादेखील मोफत केल्या जातील. रविवार, २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनापासून ही सुविधा उपलब्ध करण्याचा रुग्णालयाचा प्रयत्न आहे, असे हिंदुजाचे श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. झरीर उदवाडिया यांनी सांगितले.

प्रभावी ‘बेडाक्युलीन’ उपलब्ध

एमडीआर क्षयरोगावर प्रभावी असलेले ‘बेडाक्युलीन’ औषध या केंद्रामध्ये उपलब्ध असेल. हे औषध केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असून या केंद्राच्या माध्यमातून प्रथमच खासगी रुग्णालयामध्येही उपलब्ध होणार आहे. पालिकेकडून मोफत हे औषध पुरविले जाणार असल्याने अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहचविले जाईल, असेही डॉ. उदवाडिया यांनी सांगितले.

औषध अधिक सुरक्षित

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या शिफारशीनुसार, प्रत्येक एमडीआर रुग्णाला ‘बेडाक्युलीन’ उपचार द्यावेत असे सुचविले आहे. एमडीआरसाठी सध्या दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये हे औषध अधिक सुरक्षित आणि कमीतकमी दुष्परिणाम करणारे आहे, हे सिद्ध झाले आहे. मात्र तरीही आपल्याकडे याचा म्हणावा तितका वापर केला जात नाही. या औषधांची निर्मिती भारतात होत असूनही भारतात ऑगस्ट २०१८ पर्यंत १३६४ रुग्णांना हे औषध दिले गेले आहे. दक्षिण आफ्रिकेत ६८०० रुग्णांना हे औषध दिले असून एमडीआर रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारनेही पुढाकार घेऊन सर्व एमडीआर रुग्णांना ‘बेडाक्युलीन’ उपलब्ध करावे, असे मत डॉ. उदवाडिया यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button