breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांना शिवसेनेचे संजय राऊत यांचा मेसेज

मुंबई | महाईन्यूज

सरकार स्थापनेवरून भाजपा व शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून रोज नवनवीन वक्तव्य केली जात आहेत. तर, दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीची बैठक सुरू असताना मेसेज केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. खुद्द अजित पवार यांनीच संजय राऊत यांचा मेसेज आल्याची माहिती माध्यामांना दिली.

निवडणुकीचा निकाल लागला त्यावेळी आम्ही बोलेलो नाही, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू असताना संजय राऊत यांचा मला मेसेज आला आहे. निवडणूक झाल्यापासून पहिल्यांदाच त्यांचा मला मेसेज आलेला आहे. मी त्यांना आता फोन करून याबद्दल विचारेल” असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच, शरद पवार मुख्यमंत्री होतील का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी याची सुतराम देखील शक्यता नसल्याचेही स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, मी सहज बोललो होतो की, मागील काळात अशाप्रकारच्या घटना घडल्या होत्या. केंद्रातून काही मंत्री मुख्यमंत्री म्हणून आले, काही नेते मुख्यमंत्री म्हणून आले. या मागे कुठलंही विशेष कारण नाही. शिवाय, काल मी जे काही बोललो त्यावरून काही माध्यमांनी विविध बातम्या चालवल्या. मात्र, मी हे स्पष्ट करू इच्छितो की शरद पवारांचा यात दुरान्वये संबंध येत नाही. पवार साहेबांनी सांगितलं आहे की, राज्यात बदल घडवायचा होता म्हणून त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला, त्यांना बदल करायचा होता त्यासाठी ते प्रयत्न करत होते.

शिवसेनेकडे १७५ चं संख्याबळ असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे, यावर अजित पवार म्हणाले की, शिवसेनेकडे १७५ आकडा कसा आहे हे स्वतः संजय राऊतच सांगू शकतील. मी त्याबद्दला अधिकारवाणीने काहीच सांगू शकत नाही. माझं संजय राऊत यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. त्यांनी कोणता अंदाज मनात धरून आकडा सांगितला, याची उकल ते स्वतःच करू शकतात. मी सुरूवातीपासून सांगतो आहे की, आम्ही महाआघाडीचे जवळपास ११० जणं असून आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलेला आहे. मी काल देखील सांगितले व आज देखील सांगतो. लवकरात लवकर महायुतीने सरकार स्थापन करावं व राज्यातील प्रश्नांना तातडीने कशाप्रकारे न्याय देता येईल, याबाबत प्रयत्न करावेत.

शरद पवार व सोनिया गांधी यांच्यात होणाऱ्या भेटीबाबत त्यांनी सांगितलं की, दिल्लीत पवार साहेब गेल्यानंतर सोनिया गांधी आणि त्यांच्यात चर्चा होईल. कारण, या अगोदर राज्यातील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोनिया गांधी यांची भेट घेतलेली आहे. हे पाहता काँग्रेस हायकमांडने याबाबत काही विचार केलेला असेल. त्यामुळे या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकते. शिवसेनेच्या पाठिंब्याबात जर सोनिया गांधी यांनी काही विषय काढला, तर तशा पद्धतीने देखील चर्चा होऊ शकते. मात्र, आम्ही अगोदरपासून हेच सांगत आलेलो आहोत की, आमच्या विरोधकांना बहुमत मिळालेलं आहे. त्यांनी सरकार स्थापन करावं, आम्हाला विरोधीपक्षात बसण्याचा जनादेश मिळालेला आहे, त्यामुळे आम्ही विरोधीपक्षात बसणार आहोत. तरी देखील दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कोणताही निर्णय घेऊ शकतात, मी मागेच म्हणलो होतो की राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button