breaking-newsमहाराष्ट्र

रायगड जिल्ह्य़ात पावसाचा जोर वाढला

अलिबाग – रायगड जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्य़ातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्य़ात वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे, सखल भागात पाणी साचणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. तर माथेरान आणि खोपोली परिसरात दरड कोसळण्याच्या घटनांची नोंद झाली आहे.  गेल्या महिन्याभरापासून रुसून बसलेला मोसमी पाऊस अखेर

जिल्ह्य़ात चांगलाच सक्रिय झाला. गुरुवारी पाठोपाठ शुक्रवारीही पावसाने दमदार बॅटिंग केली. पनवेल, पेण, रोहा, महाड, पोलादपूर, अलिबाग, सुधागड, पाली येथे पावसाच्या जोर कायम होता. इतर उरण, मुरुड, श्रीवर्धन, तळा, म्हसळा, माणगाव परिसरातही पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचणे, वृक्ष उन्मळून पडणे, वीजपुरवठा खंडित होणे यांसारख्या घटना घडल्या. नेरळ, माथेरान घाटात दरड कोसळली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना घडली नाही. खोपोली येथील कमला रेसिडेन्सी परिसरातही सैल झालेले दगड डोंगरावरून खाली आले. त्यामुळे काही काळ या परिसरात घबराटीचे वातावरण होते. आंबेनळी घाटात गूळ आणि साखर घेऊन जाणारा ट्रक दरीत कोसळला. चालक आणि क्लिनरने ट्रकमधून वेळीच उडी मारल्याने ते दोघही बचावले.

जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळी आठवाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात सरासरी ८१.५६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुरुड येथे सर्वाधिक १८८ मिमी नोंद झाली. त्या खालोखाल म्हसळा येथे १६५ मिमी तळा येथे १५४ मिमी, माणगाव येथे ११७ मिमी, माथेरान येथे १११ मिमी, पोलादपूर येथे १०३ मिमी, श्रीवर्धन येथे १०२ मिमी, रोहा येथे ८७ मिमी, तर सुधागड पाली येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान येत्या २४ तासांत जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नद्यांच्या पातळीत वाढ

दोन दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. अंबा नदीची धोका पातळी आठ मीटर इतकी आहे, दिवसभर ती दुथडी भरून वाहत होती, सायंकाळी सातच्या सुमारास तिने धोका पातळी ओलांडली आहे.

संध्याकाळी उशिरापर्यंत ती ८.३० मीटर वर वाहत होती, त्यामुळे नागोठणे परिसराला पूरपरिस्थितीला समोर जावं लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे नदीकिनाऱ्यावरील गावांना जिल्हाप्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, कुंडलिका नदीची धोका पातळी २३.९५ मीटर आहे, ती संध्याकाळी सात वाजता २३.२० मीटर वर वाहत होती पावसाचा जोर कायम राहिला तर रोहा शहरातील सखल भागात नदीचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीत धुवांधार पावसाच्या सरासरीचे शतक

वेगवान वाऱ्यासह पडत असलेल्या पावसाने सलग दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यात एक दिवसाच्या सरासरीने या मोसमात प्रथमच शंभरी ओलांडली आहे.

पावसाचा हा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

गुरुवारप्रमाणेच शुक्रवारीही  पहाटे रत्नागिरी शहर आणि परिसरात कडाडणाऱ्या विजांसह मुसळधार पाऊस पडला. त्याचप्रमाणे दिवसभरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जिल्ह्याच्या अन्य भागांमध्येही अशाच प्रकारे पावसाचा जोर वाढला आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण आणि राजापूर या तालुक्यांमध्ये १०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. चौपदरीकरणाचे काम सुरू असलेल्या महामार्गावर चिखल-पाणी साठल्यामुळे वाहने चालवणे अवघड होत आहे.  यंदाच्या पावसाच्या पहिल्याच दणक्यात रस्त्यावर दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले आहेत.

दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथे वीज पडून दोन बल आणि दोन गायींचा मृत्यू झाला. यामध्ये सुमारे ९ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले.

गेल्या आठवडय़ातील कडकडीत उन्हामुळे महान जातीचे भातपीक धोक्यात आले होते. पाण्याअभावी ते करपण्याची भीती होती. पण आता सुरू झालेल्या पावसामुळे २५ हजार हेक्टरपैकी बरेचसे पीक वाचले आहे. त्याचबरोबर, शेतकऱ्यांची भातलावणीची धांदल सुरू झाली आहे.

वेधशाळेकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, शुक्रवारी  सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सर्वात जास्त, २१० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्या खालोखाल मंडणगड (१२७ मिमी ), खेड (१२४), चिपळूण (१०५) आणि राजापूर (१००) याही तालुक्यांमध्ये शतकी नोंद झाली आहे. लांजा (९०), रत्नागिरी (८८)  संगमेश्वर (८४),  गुहागर (८३) या इतर चार तालुक्यांमध्येही चांगला पाऊस  पडला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button