breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उद्धव यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचा कडक पवित्रा

‘पहारेकरी चोर आहे’ टीका भाजपला जिव्हारी

‘पहारेकरी चोर आहे’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका जिव्हारी लागल्यानेच बहुधा ठाकरे यांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ वा शिवसेनेच्या विधानांना आम्ही फारसे महत्त्व देत नाही, असा आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच शिवसेनेच्या विरोधात घेतला आहे.

शिवसेनेने कितीही टीका केली तरीही आतापर्यंत मवाळ भूमिका घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेतील दरी रुंदावल्याचे अधोरेखित झाले आहे.

राफेलवरून काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाच पण त्यापेक्षा मित्र पक्ष शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. ती थुंकी कुठे जाते हे वेगळे सांगण्याची गरज नाही’, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना उद्देशून लगावला. गेले चार वर्षे शिवसेनेकडून सातत्याने भाजप व मोदी यांच्यावर टीकाटिप्पणी केली जाते. भाजपच्या विरोधात शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपला जिव्हारी लागेल अशी टीका करण्यात आली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी भाजप आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप झाले होते. मुख्यमंत्र्यांनी तेव्हा शिवसेनेवर टीका केली होती. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्याचे टाळले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने युती करावी म्हणून भाजप आग्रही आहे. स्वतंत्रपणे लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होईल, असे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडले होते. युती करावी म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर भेट दिली होती. शिवसेनेने मात्र भाजपवर कुरघोडी करण्याचे सुरूच ठेवले. गेल्याच आठवडय़ात पंढरपूरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘पहारेकरी चोर आहे’ असे म्हटले होते. ठाकरे यांनी मोदी यांना उद्देशूनच चोर म्हटल्याने ते भाजपच्या जिव्हारी लागलेले दिसते. यातूनच ठाकरे यांना त्यांच्याच भाषेत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेले असावे.

उद्धव ठाकरे यांना योग्य वेळी आणि योग्य उत्तर देणार, या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरून भाजपनेही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी केली आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे मुंबईचे दौरे झाले. तेव्हा राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली होती.

यानंतरच मुख्यमंत्र्यांनी ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेनेला फारसे किंमत द्यायचे नाही हाच भाजपने निर्णय घेतलेला दिसतो. पत्रकार परिषदेत काँग्रेसवर शांतपणे मुख्यमंत्र्यांनी टीकाटिप्पणी केली होती. पण उद्धव ठाकरे यांच्या ‘पहारेकरी चोर आहे’या विधानाकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचा आवेश संतप्त होता. यावरून भाजपने मोदी यांच्यावर केलेली टीका फारच गांभीर्याने घेतलेली दिसते.

‘शिवसेनेला योग्य संदेश’

युतीसाठी भाजपची शिवसेनेच्या मागे फरफटत होत असल्याचे किंवा भाजपला पर्याय नाही, असेच चित्र निर्माण झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर हे चित्र बदलेल, असे मत भाजपच्या एका नेत्याकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात योग्य तो संदेश गेला आहे. शिवसेना युतीसाठी राजी नसल्यास भाजप कचरत नाही, हे भाजपने दाखवून दिल्याचेही हा नेता म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button