breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राजकीय छायाचित्रांतील फेरफार वाढले

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिसांकडील तक्रारींत वाढ; चित्रफितींतही फेरबदल
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय नेत्यांची छायाचित्रे वा चित्रफितींमध्ये फेरबदल करून (‘मॉर्फिग’) करून समाजमाध्यमांमध्ये खोटी माहिती प्रसारित करण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या सायबर पोलिसांकडे अशा संदेशांसंदर्भातील तक्रारी मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्या आहेत. निवडणुका जवळ येतील तशा या तक्रारी आणखी वाढतील, असे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी तक्रारींना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा वापर अफवा पसरवण्यासाठी सर्रास होत आहे. या माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. याचाच गैरफायदा राजकीय पक्षांचे प्रसिद्धी विभाग घेऊ लागले आहेत. एखाद्या राजकीय नेत्याच्या छायाचित्रात वा चित्रफितीत फेरफार करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे प्रकार ‘फेकन्यूज’ म्हणून ओळखले जातात. मात्र, अशा खोटय़ा संदेशांमुळे सायबर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

छायाचित्रांचा गैरवापर, चित्रफितींमध्ये फेरफार करून न उच्चारलेली वाक्ये तोंडी घालून हा अपप्रचार केला जातो. समाजमाध्यमांवर सहज उपलब्ध होतील अशी छायाचित्रे वापरून डिजिटल मिम्स तयार केली जातात. ही मिम्स समाजमाध्यमांवर पसरवली जातात, असे महाराष्ट्राचे सायबर अधीक्षक बालसिंह राजपूत यांनी सांगितले. या तक्रारी नेहमीच सुरू असतात. परंतु, आता निवडणुका जवळ आल्यामुळे राजकीय अपप्रचारासाठी अशा छायाचित्रांचा मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे, असेही त्यांनी सांगितले. एखाद्याच्या छायाचित्रात हातात चुकीचे झेंडे दाखवणे, विनोदी टॅगलाइन देणे, ध्वनिफितीत फेरफार करून शिव्या अथवा आक्षेपार्ह वाक्ये घालणे, महिलेला पुरुषाचा तर पुरुषाला महिलेचा आवाज देणे इत्यादी प्रकार सुरू आहेत. ओठांच्या हालचालीनुसार ध्वनिफिती बनवल्या जातात, असे त्यांनी सांगितले. राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी अशा गोष्टींचा वापर होतो. मात्र या प्रकारच्या संदेशांमुळे गैरसमजांबरोबरच भावना भडकण्याची भीती असते. त्यामुळे पोलिसांना सतर्क राहावे लागते, अशी माहिती त्यांनी दिली. छायाचित्रांचा गैरवापर करून बदनामी करणे आणि खंडणी उकळणे अशा गुन्ह्य़ांसाठी सायबर कायद्यानुसार कारवाई केली जाते. अनेकदा हे ‘उद्योग’ करणाऱ्यांना त्याच्या परिणामांची जाणीव नसते, असे सायबरतज्ज्ञ अ‍ॅड्. प्रशांत माळी यांनी सांगितले.

काही प्रकार

* छायाचित्रात आक्षेपार्ह बदल करणे

* भावना भडकविणाऱ्या चित्रफिती तयार करणे

* प्रतिस्पर्ध्याच्या छायाचित्रात फेरफार करून आक्षेपार्ह दृश्य तयार करणे

* चित्रफितींमधील ओठांची हालचाल बदलून आक्षेपार्ह विधाने जोडणे

* ध्वनिफितीत आक्षेपार्ह व चुकीची वाक्ये टाकून नवीन ध्वनिफिती बनवणे

सावध राहणे आवश्यक

*  आपली छायाचित्रे, चलचित्रे कोणत्याही माध्यमात शेअर करता दक्षता घ्यावी.

* माध्यमांवर उपलब्ध असलेली योग्य ती सुरक्षा यंत्रणा (सिक्युरिटी सिस्टीम) वापरावी.

* आक्षेपार्ह संदेशांविषयी सायबर पोलिसांना माहिती द्यावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button