breaking-newsपुणेमहाराष्ट्र

यंदा १०० टक्के पाणी साठवणार

‘टेमघर’ची आनंदवार्ता

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरणाची दुरुस्ती अंतिम टप्प्यावर आहे. त्यामुळे यंदा या धरणामध्ये पावसाळ्यात १०० टक्के पाणी साठवण्यात येणार आहे. त्यामुळे समाधानकारक पाऊस झाल्यास पुढील वर्षी पुणेकरांना पाण्याची चिंता करण्याचे कारण राहणार नाही.

टेमघर धरणाची क्षमता ३.७० अब्ज घनफूट (टीएमसी) एवढी आहे. सध्या या धरणाची दुरुस्ती सुरू असल्याने हे धरण रिकामे करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने, या धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठवता येत नव्हते. त्यामुळे सव्वा ते दोन टीएमसी पाणी पुणेकरांना कमी मिळत होते. यंदाच्या पावसाळ्यात ही समस्या येणार नाही, असे जलसंपदा विभागाने सोमवारी स्पष्ट केले.

दरम्यान, जलसंपदा विभागाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने धरणाची गळती थांबवण्याचे आणि धरण सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे धरणातून होणारी पाण्याची मोठी गळती थांबली आहे. धरणाच्या बाहेरील भिंतींना ग्राउटिंग करण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. धरण रिकामे केल्यापासून दीड हजार वर्ग मीटर क्षेत्रावरील ग्राउटिंग पूर्ण झाले असून, उर्वरित काम जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

धरणाच्या भिंतीला बाहेरून १०० मि.मी.चा सिमेंटचा थर देण्यात येत आहे. २१ आणि २२ मे रोजी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र (सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रीसर्च सेंटर – सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस) या संस्थेच्या तांत्रिक समितीची बैठक पार पडली. त्यामध्ये धरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली.

सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएसच्या तंत्रज्ञांनी धरणाला भेट दिली असून, कामाबाबत समाधानकारक शेरा दिला आहे. येत्या १० जूनपर्यंत प्रत्यक्ष काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर झालेल्या कामाचे परीक्षण होईल. त्यानंतर कामाची मीमांसा केली जाणार असून, याबाबतचा अहवाल तांत्रिक समितीकडे पाठवण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जूनअखेपर्यंत धरणामध्ये पावसाचे पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

गळती थांबवण्यासाठी १०० कोटी रुपयांचा खर्च

धरणाला दोन वर्षांपूर्वी गळती सुरू झाल्यामुळे धोका निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दुरुस्तीसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. त्यानंतर जलसंपदा विभागाने निविदा काढल्या. टेमघर धरणाच्या गळतीबाबत ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने कोणत्याही कंपनीने निविदांना प्रतिसाद दिला नव्हता. तीन वेळा निविदा प्रसिद्ध केल्यानंतर एका ठेकेदार कंपनीने पुढाकार घेऊन काम करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार धरणाचे काम सुरू आहे. हे धरण बांधायला २५२ कोटी रुपये खर्च आला होता. मात्र, गळती रोखण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button