breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

निलेशच्या राजकीय भवितव्यासाठी नारायण राणेंचा राष्ट्रवादीशी समझोता?

शरद पवारांनी भेट घेतल्यामुळे तर्कवितर्काना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांची त्यांच्या कणकवली येथील घरी भेट घेतल्याने तर्कवितर्क सुरू झाले आहेत. राणे यांचे पुत्र नीलेश यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लोकसभा लढवावी आणि राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा द्यावा, अशा समझोत्याचा प्रस्तावावर पवार-राणे भेटीत चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची चिन्हे आहेत. युती झाल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राहणार आहे. राणे आणि शिवसेनेतील वैमनस्य लक्षात घेता, राणे शिवसेनेला अजिबात मदत करणार नाहीत.

माजी खासदार नीलेश राणे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पण युती झाल्यास राणे यांचा नाइलाज होऊ शकतो. यामुळेच राणे यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे सांगण्यात येते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. पण आघाडी विषयीच्या चर्चेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी धरला आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध असला तरी राज्य पातळीवरील नेते मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास तयार आहेत. तशी चर्चा आघाडीच्या बैठकीत झाली आहे.

काँग्रेसकडे निवडणूक लढविण्यासाठी प्रभावी उमेदवारच नसल्याने काँग्रेस नेत्यांनी राणे पुत्रासाठी मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी दर्शविली आहे. नारायण राणे भाजपचे खासदार असले तरी त्यांना शिवसेनेशी युती मान्य नाही. यामुळेच राणे पुत्राने लोकसभेची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लढवावी आणि त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा द्यावा, असा प्रस्ताव आहे.

कोकण दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी सकाळी कणकवलीतील राणे यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या वेळी उभयतांमध्ये राजकीय प्रश्नावर चर्चा झाली. राणे यांची वेगळी वाट पत्करण्याची तयारी आहे का, याची चाचपणी पवारांनी केल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button