मुंबईत मुलींच्या भाड्याच्या खोलीत छुपे कॅमेरे ; घरमालकाला अटक
मुंबई – मुंबई शहरात नोकरी, शिक्षणानिमित्त भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या मुली-महिलांची संख्या अधिक आहे. मात्र, भाड्यांच्या घरात सीसीटीव्ही लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तीन मुली राहत असलेल्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा लपवून ठेवणाऱ्या घरमालकाला डी बी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित मुली दक्षिण मुंबईत पेईंग गेस्ट म्हणून राहात होत्या. या खोलीत 47 वर्षीय घरमालकाने कथितरित्या सीसीटीव्ही कॅमेरे लपवून ठेवले होते.
या तीन मुली पेईंग गेस्ट म्हणून घरमालकाच्या 4 बेडरुम असलेल्या अपार्टमेंटमध्ये राहात होत्या. घरमालकाने त्यामध्ये सीसीटीव्ही बसवले होते. काही दिवसांनी या मुलींच्या हे कॅमेरे निदर्शनास आलं. त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी 19 डिसेंबरला आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला. त्याला कोर्टात हजर केलं असता, न्यायालयाने 22 डिसेंबरला त्याची जामीनावर सुटका केली.
आरोपी घरमालक अविवाहित असून, तो त्याच्या आई-वडिलांसोबत राहतो. तो गिफ्ट बॉक्सचा व्यवसाय करतो. पोलिसांनी सर्व छुपे कॅमेरे जप्त केले आहेत. हे कॅमेरे आरोपीने त्याच्या मोबाईल चार्जरमध्ये लावले होते. त्यामध्ये त्याने मुलींचे अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत.
घरमालक आपल्या गप्पा चोरुन ऐकतो अशी शंका तक्रारदार मुलींना होती. त्यातच एका मुलीला आपल्या खोलीत इलेक्ट्रिक चार्जर मिळाला. त्यामुळे त्यांचा संशय आणखी बळावला. त्या मुलीने चार्जरवर कापड ठेवलं. त्यानंतर आरोपी तातडीने मुलींच्या खोलीत चेकिंगच्या बहाण्याने आला. त्याने मुलींना चार्जरवर कपडा का ठेवला याबाबत विचारणा केली. तसंच तो चार्जर टीव्ही अँटेना बुस्टर असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुलींनी त्या चार्जरचा फोटो काढून अधिक चौकशी केली असता, तो छुपा कॅमेरा असल्याचं उघड झालं. हे कॅमेरे ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या प्रकारानंतर मुलींनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.