breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईच्या उंच इमारतीचा डॉप्लर रडारला अडथळा

  • पालघर – नाशिक दरम्यानचा परिसर अदृश्य

मुंबई : सध्या राज्यावर, विशेषत: कोकण किनारपट्टीवर सात किलोमीटपर्यंत उंची असलेल्या काळ्या ढगांनी दाटी केली असली तरी ढगांची स्थिती दाखवणाऱ्या मुंबईच्या डॉप्लर रडारच्या प्रतिमांमध्ये उत्तरेच्या बाजूचा काही भाग चक्क रिकामा दिसत आहे. यासाठी हवामानाची कोणतीही स्थिती कारणीभूत ठरली नसून डॉप्लर रडारच्या वाटेत जवळच बांधलेल्या उंच इमारतीचा अडथळा आला आहे. त्यामुळे  ५०० किलोमीटपर्यंत हवामानाचा अंदाज घेणाऱ्या डॉप्लरला ३६० अंशांपैकी आठ अंश कोनातील परिसर दिसत नसून हा पट्टा पालघर- नाशिकदरम्यानचा आहे.

२६ जुलैच्या महापुरानंतर शहरासाठी डॉप्लर रडार घेण्याचा निर्णय घेण्यात आला.  शहरातील उंच इमारतींमुळे येणारे अडथळा टाळण्यासाठी शहराच्या एका कोपऱ्यात दक्षिणेला नेव्ही नगर परिसरात डॉप्लर रडार ठेवली गेली  मात्र आता शेजारीच उभ्या राहिलेल्या आणखी उंच इमारतीमुळे उत्तर दिशेकडील काही भाग डॉप्लरच्या नजरेच्या टप्प्याआड गेला आहे. ही रडार लावण्यासाठी दोन वर्षे जागेचा शोध सुरू होता. शहरात उभ्या राहत असलेल्या उंच इमारतींचे संभाव्य अडथळे लक्षात घेऊन किनारपट्टीवरील जागेचा शोध सुरू झाला. मात्र जागा सापडली नसल्याने अखेर नौदलाच्या परिसरात पूर्वीच्याच रडारच्या जागी म्हणजे अर्चना या १८ मजली इमारतीवर बांधकाम करून रडार २०१० लावले गेले. मात्र या इमारतीच्या शेजारीच २१ मजल्यांची इमारत उभी राहिली असून त्यामुळे डॉप्लरच्या कक्षेतील उत्तरेचा भाग दिसेनासा झाला आहे. उत्तरेच्या भागातील पालघर जिल्ह्य़ातील विक्रमगड, मोखाडा हे भाग डॉप्लरच्या कक्षेत येत नसून नाशिकच्या नैर्ऋत्येकडील भागही डॉप्लरच्या दृष्टिआड झाला आहे. याबाबत मुंबई हवामानशास्त्र विभागाने राज्य सरकारला आणि नौदलालाही कळवले असून त्यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत, मात्र डॉप्लरसाठी इमारतीची उंची कमी केली जाणे शक्य नसल्याचेच समोर येत आहे.

डॉप्लरच्या प्रतिमांमधून उत्तर दिशेच्या साधारण सात ते आठ अंश कोनातील माहिती गोळा करता येत नसून त्याबाबत राज्य सरकार व नौदलाला कल्पना देण्यात आली आहे. उपग्रहामार्फत येणारी छायाचित्रे तसेच इतर नोंदींचा आधार घेऊन अंदाज व्यक्त केले जात आहेत.

डॉप्लर रडारच्या दहा किलोमीटर परिसरात ८० मीटरपेक्षा उंच इमारत बांधली जाऊ नये असा नियम आहे. मात्र रडारसाठी शहराचा विकास थांबवता येणार नाही म्हणून राज्य सरकारने दुसऱ्या रडारसाठी हवामानशास्त्र विभागाला महापालिकेची गोरेगाव येथील जागा हस्तांतरित केली आहे. मात्र या रडारचा परीघ हा लहान असून ती लावण्यासाठी किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागेल. दरम्यानच्या काळात यापेक्षा अधिक उंच इमारती उभ्या राहिल्यास निर्माण होणारे अडथळे हवामान अभ्यासासाठी घातक ठरतील, अशी भीती हवामानशास्त्र अभ्यासक व्यक्त करत आहेत.

या तंत्राचा उपयोग काय?

’ ३०० किलोमीटर अंतरापर्यंत हवामानातील घडामोडी या रडारद्वारे जाणून घेता येतात.

’ डॉप्लरकडून पाठवण्यात येणारे तरंग वाटेतील वस्तूवर आदळून परत आले की त्यानुसार प्रतिमा तयार होतात. त्यामुळे वातावरणाच्या प्रत्येक स्तरावरील हवेचा दाब, वाऱ्याची दिशा, वेग, बाष्प अशा नियमित बाबींसोबतच ढगांचे आकारमान, घनता यांचीही माहिती घेण्याचे तंत्र आधुनिक डॉप्लर रडारमध्ये आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button