breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रिपाइं कार्यकर्ते बंडाच्या पवित्र्यात?

  • शरद पवार यांच्याशी चर्चा; भाजपची साथ सोडण्यासाठी दबाव

मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षातून दबाव वाढत आहे. पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली.

या बैठकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पवार यांनी केल्याचे सांगण्यात आले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर रिपाइंची युती होती, त्यावेळी या दोन्ही पक्षांनी पक्षाला काही चांगली वागणूक दिली असे नाही.  त्यांना धडा शिकविण्यासाठीच मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतला, परंतु गेल्या चार वर्षांतील भाजपचा अनुभव काही चांगला नाही.

सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे लेखी आश्वासन भाजपने पाळले नाही. रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री पद देण्यात आले, परंतु कार्यकर्त्यांना लहानलहान सत्तापदांपासून वंचित ठेवण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी आता बंडाच्या रूपात बाहेर पडण्याची शक्यता आहे.

इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारणे, लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेले घर विकत घेणे व त्याचे स्मारकात रूपांतर करणे, असे काही भाजप सरकारने निर्णय घेतले, परंतु मागासवर्गीय समाजाच्या विरोधात अनेक निर्णय या सरकारने घेतले आहेत. आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणानंतर आंबेडकरी जनतेत या सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे.

पर्यायाच्या शोधात

आगामी निवडणुकीत भाजपबरोबर युती केली तर समाज बरोबर राहणार नाही, अशी परिस्थिती आहे, त्यामुळेच पक्षातील काही कार्यकर्ते दुसरा पर्याय शोधत आहेत. शरद पवार यांची भूमिका कायम धर्मनिरपेक्ष, समतावादी, पुरोगामी राहिली आहे.  त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्यासाठी काय भू्मिका घ्यावी, याबद्दल चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षातील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पवार यांची शुक्रवारी पुण्यात भेट घेतली. बैठकीला मुंबई, पुणे,  नाशिक, यवतमाळ, अमरावती जिल्ह्य़ांतील कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती नगर जिल्ह्य़ातील पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक गायकवाड यांनी दिली.

४ ऑगस्टला बैठक

आगामी निवडणुकीत भाजपचा पराभव करायचा असेल, तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी बैठकीत केल्याचे सांगण्यात आले. त्यादृष्टीने पुढील पावले उचलली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील महिन्यात ४ ऑगस्टला नाशिक येथे राज्यभरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात येणार आहे.  बैठकीत आगामी निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची यावर चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button