breaking-newsपुणेमहाराष्ट्र

माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणीखोरी

खंडणीखोरांवर कडक कारवाईची व्यापाऱ्यांची  मागणी

पुणे : शहरातील व्यापारी पेठा, व्यापारी संकुले तसेच मॉल परिसरात माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणीखोरीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणीखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, माथाडी संघटनांच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांविरोधात पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शहरातील व्यापारी पेठांत माथाडी संघटना कार्यरत झाल्या आहे. माथाडी संघटनांच्या नावाखाली काहीजण शहरातील व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळत आहेत. मालाची चढ-उतार करताना अतिरिक्त पैशांची मागणी केली जात आहे. काहीजण संघटनेशी संबंधित नाहीत. माथाडी संघटनांमध्ये गुंड प्रवृत्तींच्या काहीजणांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे अशा गुंडांवर संघटनांचे नियंत्रण नसल्याने सर्रास खंडणीखोरीचे प्रकार सुरू झाले आहेत.

दरम्यान, शहरातील विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, सूर्यकांत पाठक, रतन किराड, अरविंद कोठारी, मनोज  सारडा, सतिश रहेजा, अजित सांगळे आदी या वेळी उपस्थित होते. माथाडींच्या नावाखाली सुरू असलेली दादागिरी तसेच खंडणीखोरी पोलिसांनी रोखावी, अशी मागणी व्यापारी महासंघाकडून करण्यात आली.

कॅमेरे बसवावेत

‘सहकार्यातून सुरक्षिततेकडे’ या योजनेत व्यापाऱ्यांनी दुकानाच्या दर्शनी भागात किमान एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप देशपांडे यांनी केले. सीसीटीव्ही कॅमेरा दर्शनी भागात बसवल्यास पदपथ आणि रस्त्यावरील हालचालींवर नजर ठेवणे शक्य होईल. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने कॅमेरे उपयुक्त ठरतील.

खंडणीखोरांच्या विरोधात तक्रारी द्या

व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन करताना बैठकीत अतिरिक्त आयुक्त देशपांडे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सरदेशपांडे यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक व्यापाऱ्यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button