breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची शरद पवारांनी काढली अक्कल

मुंबई |महाईन्यूज|

भाजप सरकारच्या काळात अभ्यासक्रमात बदल केला. महापुरुषांचा वारसा असलेल्या राज्यात गेल्या शिक्षणमंत्र्यांनी चुकीचे निर्णय घेतले. शाळा, शिक्षकांच्या प्रश्‍नांसाठी कमीपणा न मानता मी तत्कालीन शिक्षणमंत्र्यांच्या घरी गेलो. त्यांच्याकडून प्रश्‍न सोडवण्याची अपेक्षा होती, पण त्यांनी शाळा बंद केल्या. शाळा बंद करण्यास अक्कल लागत नाही, त्या चालू ठेवण्यास अक्कल लागते, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी विनोद तावडे यांना नाव न घेता लगावला.

शिक्षक भारती संघटनेचे पहिले राज्य अधिवेशन शनिवारी वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिर स्टेडियम येथे आयोजित करण्यात आले होते, या वेळी पवार बोलत होते. या वेळी पवार यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतलेल्या निर्णयांवर शेलक्‍या शब्दांत टीका केली. लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकातील धड्यात शरद कमळ बघ, छगन कमळ बघ असे शिकवले जाते. त्यांना वाटले ही लहान मुले बघतील कमळ, असेही पवार उपरोधात्मक म्हणाले; मात्र माझ्यावर लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत.

मला आणि संजय राऊतांना प्रशासनाचा अधिकार नाही; मात्र आम्ही मंत्र्यांना शिक्षकांच्या प्रश्‍नांविषयी सांगू ते आमचे ऐकतील असे वाटते, असेही पवार या वेळी म्हणाले. मी आणि संजय राऊत मागितला तर सल्ला देतो असेही पवार म्हणाले. या वेळी शिक्षक आमदार कपिल पाटील यांचे भाषण झाले. याप्रसंगी विशेष कामगिरी करणाऱ्या शाळा, शिक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

भाजपकडून शिक्षण क्षेत्रात विष पेरण्याचा प्रयत्न
या वेळी संजय राऊत यांनीही गेल्या सरकारने शिक्षणाच्या आयचा घो केला, अशा शब्दांत टीका केली. तेव्हा शिक्षक आमच्याकडे प्रश्‍न घेऊन यायचे, मी त्यांनी सांगायचो, आपले सरकार येईल त्या वेळी प्रश्‍न सोडवू. त्यांनी पाच वर्षांत धडे बदलले, पण आपण सरकारच बदलले. एवढा मोठा धडा देशाला दिला आहे. सत्तेत असलो तरी शिक्षकांच्या मागण्यांच्या निवेदनाचे होर्डिंग मंत्रालयासमोर लावा, जेव्हा शिक्षणमंत्री येता-जाता ते पाहतील, तेव्हा त्यांच्या लक्षात प्रश्‍न येतील असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button