ताज्या घडामोडीमुंबई

‘लालपरी’ची सेवा पूर्वपदावर; पण १६ हजार एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

मुंबई |विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी  गेल्या सहा महिन्यांपासून आंदोलनाचे हत्यार उपसलेले एसटी कर्मचारी अखेर सेवेत रूजू झाले आहेत. त्यामुळे सामान्यांची जीवनवाहिनी असलेली एसटी पुन्हा एकदा रस्त्यांवर धावू लागली आहे. एसटीच्या पटावरील एकूण ८२,२६३ कर्मचाऱ्यांपैकी ७६,९६२ कर्मचारी गुरुवारपर्यंत कामावर परतले आहेत. ११ हजार कर्मचारी अद्याप बडतर्फ आहेत. संपापूर्वी एसटीच्या सेवेत एकूण ९२,२६६ कर्मचारी होते.

दीर्घ प्रतीक्षेनंतर मोठ्या प्रमाणावर बसफेऱ्या सुरू झाल्याचे दिलासादायक चित्र राज्यात दिसू लागले असून ग्रामीण भागाला मोठा आधार मिळू लागला आहे. बुधवारी महामंडळाने राज्यात २९ हजार फेऱ्या चालवल्या. यातून १७.७८ लाख प्रवाशांची वाहतूक करत ११ कोटींचे उत्पन्न मिळवले, अशी माहिती महामंडळाने दिली. विलीनीकरण, वेतनवाढीसह अनेक मागण्यांसाठी २५ ऑक्टोबर २०२१ पासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते.

संपकरी कर्मचारी कामावर परतत असल्याने सेवा पूर्वपदावर येण्याची आशा आहे. मात्र, एसटी महामंडळातील पाच हजारांहून अधिक बसची स्थिती भंगारसदृश्य झाल्याने आता प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. बेस्टच्या धर्तीवर एसटी महामंडळ करारानुसार खासगी बस चालवणार आहे. या बससाठी ४७ रुपये प्रतिकिमी असा मोबदला महामंडळ देणार आहे.

लातूर, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या विभागात खासगी गाड्यांसाठी ‘मे. साई गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स’ची निवड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ५०० गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. सध्या ३२० गाड्यांपैकी २२० गाड्यांचे कंत्राट ‘साई गणेश’ला देण्यात आले. १८० गाड्यांसाठीही ही ट्रॅव्हल कंपनी प्रयत्नात आहे. लातूर, धुळे, कोल्हापूर व रायगड/ रत्नागिरी विभागांमध्ये साध्या बसची उणीव भासत आहे. या भागातील अन्य फेऱ्यांना मागणी वाढत आहे. अशातच प्रवाशांकडून साधी एसटी सुरू करण्याची मागणी होत असल्याने भाडेतत्त्वावरील गाड्या या विभागात प्राथमिकतेने सुरू करण्यात येणार आहेत.

शरद पवारांच्या निवासस्थानी हिंसक आंदोलन, आता मुंबई पोलिसांनी केला मोठा दावा

महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ८ जुलै २०२१ मध्ये ५०० साध्या बस भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने मांडला होता. यासाठी वाहतूक विभागाने ऑक्टोबर २०२१मध्ये निविदा काढल्या होत्या. १२ मार्च २०२२ मध्ये ४४ ते ४७ रुपये प्रति किलोमीटर दराने या गाड्या घेण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

बेस्टच्या खासगी बसचालकांचे ‘काम बंद’

पटावरील ८२,२६३पैकी ७६,९६२ कर्मचारी कामावर परतले

२७,८२० चालक

२२,७०२ वाहक

११,९१० प्रशासकीय कर्मचारी

विभाग – बस संख्या – निविदाकार – वाटाघाटीनंतरच्या अंतिम दर(प्रतिकिमी रुपये)

लातूर -६०- साई गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स -४३.७५

धुळे – १०० -जे. पी. ब्रदर्स – ४३. ७५

कोल्हापूर – ६० – साई गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स – ४४

रायगड/रत्नागिरी – ५०/५० – साई गणेश टुर्स अँड ट्रॅव्हल्स -४७

१६ हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई?

उच्च न्यायालयाने सर्व संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्यासाठी आज, २२ एप्रिल ही मुदत दिली आहे. अद्याप १६ हजार संपकरी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. यातील ११ हजार कर्मचारी बडतर्फ आहेत. यामुळे त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई कायम राहणार की त्यांना मुदतवाढ मिळणार, यावर शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button