breaking-newsक्रिडा

महिला हॉकी संघ उपान्त्य फेरीत

  • अखेरच्या गटसाखळी सामन्यात छथायलंडवर 5-0ने मात 
जकार्ता: कर्णधार राणी रामपालची हॅटट्रिक आणि अन्य खेळाडूंनी तिला दिलेली साथ यामुळे भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचे आव्हान मोडून काढताना आशियाई क्रीडास्पर्धेतील महिलांच्या हॉकी स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. ब गटातील या महत्त्वाच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांनी थायलंडचा 5-0 असा धुव्वा उडवीत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली.
थायलंडवरील विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाने ब गटात अपराजित राहताना 12 गुणांसह पहिल्या क्रमांकाने उपान्त्य फेरी गाठली आहे. भारतीय महिलांनी मिळविलेल्या चार विजयांमध्ये गतविजेत्या दक्षिण कोरियावरील विजयाचाही समावेश आहे. तिसऱ्या गटसाखळी सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण कोरियाला 4-1 असे पराभूत केले होते.
थायलंडच्या महिला संघाने भारताला कडवी झुंज दिल्यामुळे पहिल्या दोन्ही सत्रांमध्ये गोलशून्य बरोबरी कायम राहिली होती. तिसऱ्या सत्रानंतर मात्र भारतीय महिलांनी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर वर्चस्व गाजविले व उत्तरार्धात पाच गोलची नोंद करीत चमकदार विजयाची पूर्तता केली. राणी रामपालने पहिला, दुसरा व पाचवा गोल करताना शानदार हॅटट्रिकची नोंद करीत भारतीय महिलांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मोनिकाने तिसरा गोल केला, तर नवजोत कौरने चौथा गोल करताना आपल्या कर्णधाराला सुरेख साथ दिली.
त्याआधी पहिल्या सत्रात थायलंडच्याच खेळाडूंनी बराच वेळ चेंडूवर नियंत्रण राखले. मात्र त्याच वेळी भारतीय महिलांनी संयमी खेळ केला. त्यात एकदा राणी रामपालचा रिव्हर्स फ्लिक अगदी थोडक्‍यात चुकला. पाठोपाठ भारतीय महिलांना पहिला पेनल्टी कॉर्नरही मिळाला. परंतु भारताच्या दीप ग्रेस एक्‍काचा फटका थायलंडच्या बचावपटूने रोखला. दुसऱ्या सत्राच्या प्रारंभी पुन्हा एकदा राणीचा फटका थोडक्‍याने चुकला. तसेच वंदना कटारियाचा प्रयत्न थायलंडची गोलरक्षक ऍलिसा न्यूरिनग्रामने विफल ठरविला.
मध्यंतरानंतर भारताला तिसऱ्या सत्रात लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु दोन्ही वेळा थायलंडची गोलरक्षक ऍलिसाने गुरजित कौरचा फटका निष्फळ ठरविला. अखेर 37व्या मिनिटाला भारतीय महिलांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पहिले यश मिळाले. या वेळी उदिताचा जोरदार फटका ऍलिसाने रोखल्यावर राणी रामपालने रिबाऊंडवर भारताचे खाते उघडले. तिसऱ्या सत्राअखेर भारतीय महिलांकडे 1-0 अशी आघाडी होती.
चौथ्या सत्राच्या सुरुवातीला दडपणाखाली असलेल्या थायलंडच्या खेळाडूंना राणीने पुन्हा पेचात पकडले व आणखी एका रिबाऊंडवर 46व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. त्यानंतर अखेरच्या 10 मिनिटांत भारतीय महिलांनी तीन वेळा लक्ष्यवेध केला. 51व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दीप ग्रेसचा फटका ऍलिसाने रोखल्यावर मोनिकाने पुढच्याच मिनिटाला रिबाऊंडवर भारताचा तिसरा गोल केला. तसेच नवजोत व राणी रामपालने आणखी दोन सुरेख मैदानी गोलची नोंद करताना एकतर्फी विजयासह भारताच्या उपान्त्य फेरीची निश्‍चिती केली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button