breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महावितरणच्या प्राधिकरण कार्यालयात थोतांड अभियंत्याची ‘खाबुगिरी’

  • अधिकारी मिलींद चौधरी यांची अनुपस्थिती नित्याचीच
  • ‘पीसीईसीए’ने गांधीगिरी मार्गाने शिकविला ‘धडा’

पिंपरी / महाईन्यूज 

महावितरण प्रशासनातील थोतांड अधिका-यांच्या गलथान कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित रहात आहेत. महावितरणच्या प्राधिकरण उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी कार्यालयात कायमचेच गैरहजर राहत असल्यामुळे त्यांच्याबाबत नागरिकांच्या मनामध्ये रोष निर्माण होत आहे. चौधरी यांच्या बेजबाबदार वागण्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने आज गांधीगिरी पध्दतीने आंदोलन केले. त्यांच्या गैरहजेरीत ते बसत असलेल्या खुर्चीवर पुष्पगुच्छ ठेवून तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

महाराष्ट्र विद्युत बोर्डाने प्रथम ते चतुर्थ श्रेणीतील सर्वच कर्मचा-यांना कार्यालयीन कामकाज करण्यासाठी निर्धारित नियमावली आमलात आणली आहे. सकाळी वेळेत हजर राहणे, लंच ब्रेक, कामकाजाचा शेवट, गणवेश परिधान करणे, नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे, वरिष्ठांच्या सूचनांचे अनुपालन करणे व तत्सम कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे. अशा नियमांचे पालन करणे शिपायापासून ते मुख्य अधिका-यापर्यंत अनिवार्य आहे. तरी, महावितरणच्या प्राधिकरण कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांचा रुबाब स्वतःची अस्थापना असल्यासारखा असतो. कार्यालयात हजर रहात नसल्यामुळे नागरिकांच्या असंख्य तक्रारी वाढल्या आहेत. विविध सामाजिक संघटना, संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळातील पदाधिकारी नागरिकांचे प्रश्न घेऊन गेले असता ते कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे पदाधिका-यांना व नागरिकांना नाहक त्यांची वाट पाहत बसावे लागते. महावितरणचा गणवेश परिधान करत नसल्यामुळे कार्यालयातील अधिकारी आहेत की, सर्वसामान्य व्यक्ती असा प्रश्न नागरिकांना पडतो. त्यांच्या अशा थोतांड वागण्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

 अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांच्या बेजबाबदार वार्तणुकीचा निषेध करत पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने त्यांचा निगड प्राधिकरण महावितरण कार्यालयातील त्यांच्या कक्षाला आज भेट दिली. त्यावेळी चौधरी कक्षात उपस्थित नव्हते. त्यावेळी गांधीगिरी पध्दतीने असोसिएशनच्या पदाधिका-यांना त्यांच्या रिकाम्या खुर्चीवर पुष्पगुच्छ ठेवून त्यांचा निषेध केला. हे समजताच चौधरी त्याठिकाणी धावत आले. त्यानंतर तोच पुष्पगुच्छ त्यांना देऊन त्यांच्याकडून सकारात्मक आणि चांगल्या कामाची आपेक्षा व्यक्त केली. अशा पध्दतीने असोसिएशनच्या पदाधिका-यांनी चौधरी यांना चांगलाच धडा शिकवला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश बक्षी, कार्याध्यक्ष तथा शिवसेना संघटक संतोष सौंदणकर, सचिव तथा विभागप्रमुख नितीन बोंडे, संजीव पाटील, सुनिल पवार, नटराज बोबडे, महेश माने आदी उपस्थित होते.

आवश्य वाचा – कामचुकार अधिका-यांमुळे रुपीनगरचा विद्युत पुरवठा तब्बल सात तास खंडीत

चौधरी यांची कार्यकिर्द वादाच्या ‘भोव-यात’

निगडी प्राधिकरण उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकरी अभियंता मिलिंद चौधरी यांच्या हाताखाली सुमारे 40 अभियंत्यांचा स्टाफ कार्यरत आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चौधरी कार्यालयात हजर रहात नसल्यामुळे हाताखालचे सर्वच अभियंते व इतर कर्मचारी वैतागले आहेत. कोणतेही काम करायचे झाल्यास त्यांची परवानगी घ्यावी लागते. ते कार्यालयात उपस्थित राहत नसल्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांना नागरिकांच्या संतापाचे धनी व्हावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा संपूर्ण स्टाफ त्यांच्यावर नाराज आहे. त्यांनी राज्याच्या उर्जा मंत्र्यांपर्यंत चौधरी यांच्याबाबतीत तक्रारी केल्या आहेत. मुळात चौधरी यांचे महावितरण व्यतीरिक्त खासगी कामांकडे अधिक लक्ष असल्यामुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली जात आहेत. खासगी कामे करत असल्याचा देखील त्यांच्यावर आरोप असल्यामुळे चौधरी यांची कार्यकिर्द वादाच्या भोव-यात सापडली आहे.  

आवश्य वाचा – रस्टन कॉलनीतील प्रलंबित कामे आठ दिवसांत पूर्ण करा, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देणार – संतोष सौंदणकर

पिंपरी व भोसरीच्या समस्यांसाठी विशेष बैठक

निगडी प्राधिकरण उपविभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात विज ग्राहक आणि अन्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. तरी, गेली अनेक महिने अधिकारी जाग्यावर नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार गुरुवारी (दि. 3) संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यानंतर असोसिएशनने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली. याच्या निषेधार्त गांधीगिरी मार्गाने पुष्पगुच्छ अधिकाऱ्याच्या खुर्चीवर ठेवून निषेध करण्यात आला. याची माहिती मिळताच संबंधित अधिकारी कार्यालयात आले. त्यानंतर तोच पुष्पगुच्छ त्यांना देऊन कामकाजात सुधारणा करावी, नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी विनंती त्यांना करण्यात आली. पिंपरी आणि भोसरी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या उपस्थितीत एक बैठक लावण्याची मागणी केली. त्यांच्याकडून बैठकीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला, अशी माहिती कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button