breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका पंतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; सभासदांनी उठविला एकाधिकारशाहीवर आवाज

  • संचालक अंबर चिंचवडे यांना बोलण्यास केला मज्जाव

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) आचार्य अत्रे रंगमंदिरात घेण्यात आली. या सभेत संचालक अंबर चिंचवडे यांनी पतसंस्थेत आणि महासंघात चाललेल्या एकाधिकारशाही विरोधात आवाज उठविला. याप्रसंगी काही संचालक व इतर सभासदांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेत त्यांचे म्हणणे मांडण्यास विरोध केला. त्यामुळे काहीकाळ सभेत गोंधळ उडाला होता. 

याबाबत अंबर चिंचवडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सदर सभेमध्ये नियमानुसार सभासदांनी उपस्थित केलेले प्रश्न व पत्राला संस्थेच्या वतीने उत्तर देणे बंधनकारक होते. तथापी संस्थेचे संचालक या नात्याने मी गेले वर्षभर विविध प्रश्न लेखी स्वरुपात संस्थेकडे पत्राद्वारे कळविले होते. त्यावर त्यांना आजतागायत कोणतेही उत्तर दिलेले नाही. सदर कार्यक्रमामध्ये विषय क्र. ८ साठी मी हरकत घेतली होती.  या विषयास उपस्थित बहुसंख्य सभासदांनी याचे समर्थन केले. कारण गेली पाच वर्ष एकच व्यक्ती वेगवेगळया फर्मच्या नावाने वैधानिक लेखापरिक्षण करतात. तथापी संस्थेमधील अनियमिततेकडे दुर्लक्ष करुन अहवाल देतात. त्याच संस्थेला सन २०१९ – २० साठी नेमणूक करणेस मी व इतर सभासदांनी हरकत घेतली असता संस्थेचे संचालक आणि काही सभासद यांनी माझ्या हातातील माईक हिसकावून घेतला. त्यांनी मला म्हणणे मांडण्यास विरोध केला. तसेच संचालक मंडळाच्या काही संचालकांनी त्यामध्ये मला अडथळा निर्माण करणेचा प्रयत्न केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आमदार लक्ष्मण जगताप यांनी हस्तक्षेप करीत मला माझे म्हणणे मांडण्यास सांगीतले. त्यामुळे मला संस्थेकडे गेली वर्षभर केलेला पत्रव्यवहार व त्यावर संस्थेने कोणतेही उत्तर न दिल्याबाबत स्पष्टता करता आली. तसेच संस्थेमध्ये एका व्यक्तीची चालू असलेली हुकूमशाही याविरुध्दही मी माहिती दिली. संस्थेमधील अनेक कामे घटनाबाहा, अनियमितपणे चालु असलेले प्रकार मी सांगितले. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी यांनी कोणताही खुलासा न करता गोंधळ निर्माण करून, माझ्या भाषणामध्ये व्यत्यय आणला. जर संचालकांनाच जर अशा प्रकारची वागणूक उपस्थित शेकडो सभासदांसमोर मिळत असेल तर, सर्वसामान्य सभासदांना संस्थेकडून न्याय कसा मिळणार? याबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष कै. शंकर आण्णा गावडे यांच्या नावाचा वापर करुन पतसंस्थेमध्ये गेली १५ वर्षे पॅनेल निवडून आले. त्याच कै. शंकर अण्णा गावडे यांच्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या विचारांना यावेळी हरताळ फासण्यात आला. याबाबत पुढील काळात सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन एका व्यक्तिची चालू असलेली हकूमशाही व अयोग्य कृती याविरुद्ध सनदशिर मार्गांनी आवाज उठविणार आहे, असे चिंचवडे यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकांत म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button