breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका अधिकारी, कर्मचा-यांनी संपत्ती जाहीर न करण्यामागे दडलंय काय ? 

– मालमत्ता विवरण सादर करण्यास चालढकल 

विकास शिंदे 

पिंपरी, ( महा ई न्यूज ) – “श्रीमंत’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी मालामाल आहेत. अधिकाऱ्यांना दरवर्षी स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण पत्र महापालिकेला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेच्या वर्ग 1 ते 3 मधील तब्बल एक हजार 183 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःची व कुटूंबियांची मालकी असलेली स्थावर व जंगम मालमत्ता दडविली आहे. त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण मालमत्ता किती? याचा अंदाज महापालिका भवनासमोर लावलेल्या महागड्या गाड्यांवरुनच सर्वसामान्य बांधत असून मालमत्ता विवरणपत्र सादर करण्यास चालढकल केली जात आहे.  

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. या ठिकाणी बदली करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच लागलेली असते. त्याचबरोबर महानगरपालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली केल्यास लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप करुन पुर्वीच्याच ठिकाणी नियुक्‍ती करावी, असा हट्ट करत असतात. त्यामुळे स्थापत्य, बांधकाम, नगररचना, प्रशासन, आरोग्य, वैद्यकीय, पाणी पुरवठा, शिक्षण, विद्युत, पर्यावरण आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्षांनुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांच्या आश्रयाला जाऊन “तुम्ही पण जगा अन्‌ आम्हालाही जगू द्या’, असा पवित्रा घेतला आहे.

महापालिका आस्थापनेवर काम करणाऱ्या वर्ग 1 ते 3 च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरणपत्र दरवर्षी सादर करणे बंधनकारक आहे. सन 2016-17 आणि 2017-18 वर्षातील एक हजार 183 अधिकारी व कर्मचा-यांनी ते सादर केलेले नाही. त्यानुसार 3 हजार 276 अधिकारी कर्मचा-यांना मालमत्ता माहितीचे विवरणपत्र प्रशासन विभागाकडे तर वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांचे विवरणपत्र त्या-त्या विभागाच्या विभाग प्रमुखांकडे सादर करावे लागते. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत “झोपेचे सोंग’ घेतले आहे.

महानगरपालिकेतील अनेक बड्या अधिकारी उद्योग, व्यवसाय शहरात सुरु आहेत. काहींनी कुटुंबियांच्या नावावर कंत्राटे घेतली आहेत. काही अधिकाऱ्यांचा वाहन, घरे व इतर डामडौल पाहता त्यांच्या “श्रीमंती’चा अंदाज बांधता येणे शक्य नाही. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांचे वाढदिवस, लग्न सोहळे एखाद्या राजकीय पुढाऱ्याला लाजवेल,असे आहेत. मागील दोन वर्षांपासून अनेकांनी मालमत्ता विवरणपत्र सादर केले नसल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासन विभागाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने ते गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असताना प्रशासन विभागाने बोटचेपी भूमिका घेतल्याने त्यांना पाठिशी घालण्यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

———-

दोन वर्षात मालमत्ता विवरण सादर न केलेले अधिकारी 
तपशील वर्ग               1 वर्ग      वर्ग  2      वर्ग 3 
सादर केलेले               115        411        4843 
सादर न केलेले           25        115          1043 
एकूण                       140       526         5886 
 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button