breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मनोज मुकुंद नरवणे आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदी…

नवी दिल्ली|महाईन्यूज|

जनरल बिपीन रावत यांच्या निवृत्तीनंतर लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार सांभाळणार आहेत. सध्या लष्करप्रमुखपदी असलेल्या बिपीन रावत यांच्यानंतर मनोज नरवणे सैन्यातील एक अनुभवी अधिकारी होते. बिपीन रावत आज सेवानिवृत्त होणार असून मनोज नरवणे लष्करप्रमुखपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज नरवणेंकडे पूर्व मुख्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. लष्कराच्या दृष्टीनं पूर्व मुख्यालयाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. चीनला लागून असलेल्या जवळपास ४ हजार किलोमीटर सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी पूर्व मुख्यालयाकडे असते. त्यामुळे या पदाची धुरा खांद्यावर घेतल्यापासूनच नरवणेंचं नाव लष्करप्रमुख पदाच्या शर्यतीत होतं.

आपल्या ३७ वर्षांच्या सेवाकाळात मनोज नरवणेंनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. जवळपास सर्वच परिस्थितींमध्ये काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येच्या राज्यांमधील आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी अतिशय उत्तम कामगिरी बजावली आहे. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स बटालियनचं यशस्वी नेतृत्त्व त्यांनी केलं आहे. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकातही त्यांनी उल्लेखनीय काम केलं. याशिवाय म्यानमारमधील दूतावासातही त्यांनी तीन वर्ष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली.

नरवणे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण ‘ज्ञानप्रबोधिनी’त झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षणानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते जून १९८० ‘७ सीख लाइट इन्फंट्री’मधून लष्करात रूजू झाले. आसाम रायफलचे उत्तर-पूर्व विभागाचे ‘इन्स्पेक्टर जनरल’, स्ट्राइक कोअरचे दिल्ली क्षेत्रातील ‘जनरल ऑफिसर इन कमांडिंग’, लष्कर प्रशिक्षण विभागाचे प्रमुख, महू स्थित लष्कर युद्धशास्त्र महाविद्यालयात प्रशिक्षक अशा अनेक पदांवर काम करताना त्यांनी ठसा उमटवला. परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button