breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेची शहर बंदची हाक; शहराध्यक्ष सचिन चिखले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पिंपरी | महाईन्यज | प्रतिनिधी

करोना हा विषाणू दिवसेंदिवस अधिक घातक होत चालला आहे. महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. तर महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड शहरात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. दररोज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण ९२ व्यक्तींचे करोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवड शहर मनसे अध्यक्ष तथा पिं. चिं. मनपाचा गटनेता व सर्वसामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी सचिन चिखले अशा गंभीर बाबीकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. श्रावण हर्डीकर आपणा दोघांचे लक्ष वेधू इच्छितो. आपणास निवेदनाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येला आवर घालण्यासाठी प्रतिबंधात्मक व खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर येत्या ३१ मार्चपर्यंत बंद (Shut down) ठेवण्यात यावे व त्या कालावधीत संपूर्ण शहरभर जंतुनाशक द्रव्यांची फवारणी करून शहर निर्जंतुक करण्यात यावे, अशी मागणी करीत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील मंदिर समित्यांनी भाविकांना देवदर्शन बंद केले आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाय योजले जात असताना, महाराष्ट्रातील अनेक देवस्थानांनी पुढील काही दिवस मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरांसह, मठ, दर्गे येथेही भाविकांना न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय सर्व शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा आणि राजकीय कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत पब आणि ऑर्केस्ट्रा, बार बंद आहेत. पुण्यामध्ये काही ठिकाणी दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली आहेत.

करोना या विषाणूचा सर्वाधिक संसर्ग पिंपरी चिंचवड शहराला झालेला आहे. मुळात अजून बऱ्याच जणांची करोना अहवाल चाचणी येणे बाकी आहे. राज्यात प्रयोगशाळांची कमतरता असल्यामुळे चाचण्यांचा परिणाम येण्यास विलंब होत आहे. शहरात दिवसभरात एक रुग्ण करोना पॉझिटीव्ह निघत आहे. असे असतानाही शहरातील सर्व व्यवहार बिनदिक्कत सुरु आहेत. शहरातील भाजी मार्केट, पिंपरी छावणी परिसर, शहरातील वर्दळीचे चौक व जनजीवन सर्व काही आलबेल असल्यासागत सुरु आहे.

महापालिकेकडूनही हवी तेवढी जनजागृती होताना दिसून येत नाही. जनजागृती करणारे महापालिकेचे कर्मचारी, आरोग्य सेवक/सेविका, आशा स्वयंसेविका यांना कोणतेही सुरक्षा साधने पुरविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. शहर बंद केल्याने येत्या १२ दिवसांत जनतेला आपोआपच स्वयंशिस्त लागेल. त्यामुळे अस्मानी संकट टळले जाऊ शकेल. याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाने शहर बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास द्याव्यात, त्यामुळे निश्चितच करोना विषाणूला अटकाव बसेल व अल्प कालावधीत शहरातील जनजीवन सुरळीत होऊ शकेल, अशा मागणीचे निवेदन मी आपणास देत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button