breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मंदिरं बंद; उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार, भाजपाचे ‘लाक्षणिक उपोषण’

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे सहा ठिकाणी आंदोलन

कीर्तन, टाळ- मृदंगाच्या गजरात राज्य सरकारचे लक्ष वेधले

पिंपरी । प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरं बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद ठेवली आहेत. या निर्णयाविरोधात आणि आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत. या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, गीता महेंद्र, उदय गाकवाड, सुनील लांडे, प्रवीण काळजे, सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका प्रियांका बारसे, राजश्री जायभय, सरिता शर्मा, प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.
तसेच, चिंचवड गाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारतही आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील सहा मंदिरांच्या आवारात दिवसभरात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे, योगेश चिंचवडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला. लॉकडाउन संपल्यानंतर पहिला निर्णय राज्य सरकारने घेतला तो दारुची दुकाने चालू केली. हॉटेल चालू झाले. बिअर बार चालू झाले. मात्र, मंदिरं उघडली, तर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध राज्य सरकारने लावला आहे. त्याला भाजपाचा विरोध आहे. नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरं खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

वारकरी बेशिस्त आहेत काय ? : ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड

गेले सहा महिने आपली मंदिरं बंद आहेत. महामारी आहे. जागतिक संकट आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व जाती-धर्माच्या नागरिकांनी शासनाचे आदेश पाळले आहेत. सर्व धार्मिक विधी आपण घरीच केले आहेत. लॉकडाउननंतर सरकारने सर्व व्यवहार सुरळीत झाली आहेत. आता शाळा, मंदिरं बंद आहेत. शाळकरी मुले नियमांचे पालन करणार नाहीत म्हणून शाळा बंद ठेवल्या. वारकरी बेशिस्त आहेत म्हणून मंदिरं बंद ठेवली आहेत का? असा प्रश्न ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड यांनी उपस्थित केला. वारकरी, भक्तांना शाळकरी मुलांच्या पंक्तीत बसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, अशी टीकाही गायकवाड यांनी केली आहे.
*
…तर भाजपाच्या रणरागिणी मंदिरांची कुलपं तोडतील : महापौर
महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद ठेवली आहे. आता नवरात्रोत्सव येत आहे. याकाळात महिला- भगिनींची व्रत असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरंच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरं बंद का ठेवली जात आहेत? असा सवाल उपस्थित करीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच, मंदिरं उघडली नाहीत, तर भाजपाचा रणरागिनी मंदिरांची कुलपं तोडून प्रवेश करतील, असा इशाराही दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button