breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही’- परिवहन मंत्री अनिल परब

चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणात जाण्याची परवानगी आहे की नाही आणि असली तरी त्यात काही नियम अटी लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परवानगी आहे की नाही यासाठी सगळेच संभ्रमात होते. मात्र आता राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत घेऊन गणपतीला चाकरमानी कोकोणात जोऊ शकतात आणि त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याचं परब यांनी स्पष्ट केलं.

कोरोनामुळे यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट बिकट बनली आहे. त्यात सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या एका आढावा बैठकीचं इतिवृत्त समोर आल्यानं त्यावरून राजकारणही तापलं आहे. ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर सिंधुदुर्गात चाकरमान्यांना प्रवेशबंदी असेल, या सह अनेक जाचक अटींचा उल्लेख या इतिवृत्तात होता. हे इतिवृत्त पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर दुसऱ्याच दिवशी रद्द करण्यात आलं असलं तरी चाकरमान्यांमधील संभ्रम मात्र अद्याप दूर झालेला नाही.

राज्य शासनाने याबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा व नियमावली निश्चित करावी, अशी मागणी सर्वच करत आहेत. त्यात क्वारंटाइन कालावधी १४ ऐवजी ७ दिवसांचा करावा, असा आग्रह सत्ताधारी शिवसेनेनंच धरला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नव्या प्रशासकीय इमारतीत आढावा बैठक झाली. या बैठकीत चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी येणाऱ्या समस्यांवर चर्चा झाली. बैठकीबाबत अनिल परब यांनी नंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेणार असून त्यादृष्टीने विषय चर्चिले गेले. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन त्यावर पुढील निर्णय होणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले

चाकरमान्यांना गणपतीसाठी कोकणातील गावी जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम व अटी निश्चित केल्या जाणार असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल, असेही परब यांनी नमूद केले. गणपतीसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जातात. त्यासोबतच एसटीच्या ज्यादा गाड्याही सोडल्या जातात. यंदा रेल्वेगाड्यांची शक्यता अगदीच धुसर आहे. याबाबत विचारले असता परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असे परब यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button