breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरी मतदार संघातील नागरिकांच्या सोयीसाठी दहा पाण्याच्या टाक्या बांधण्याचे नियोजन – आयुक्त हर्डीकर

  • आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून परिसंवादाचे आयोजन
  • मोशी, चिखली भागातील रहिवाशांच्या प्रश्नांना आयुक्तांनी दिली उत्तरे

पिंपरी, (महाईन्यूज) – चिखली, मोशी येथपासून ते च-होली या संपूर्ण इंद्रायणीच्या पट्ट्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी दहा पाण्याच्या टाक्या बांधण्याची योजना आखत आहोत. त्याकरिता नवीन जलवाहिण्या भूमीगत करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. पाण्याची गळती रोखून येत्या एक वर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला पुरेसे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवाशांना दिला.

भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि चिखली, मोशी हौसिंग सोसायटी फेडरेशन यांच्या वतीने या भागातील सोसायट्यांमध्ये राहणा-या नागरिकांची बिल्डरांकडून होणा-या त्रासातून मुक्तता करण्यासाठी चिखली येथील सिटी प्राईड शाळेमधील सभागृहात ‘परिसंवाद’ घेण्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोसायटीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर आयुक्त हार्डीकर यांनी महापालिकेशी निगडीत बाबींची उलक करून प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी चर्चा केली. यावेळी सहशहर अभियंता राजन पाटील, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त प्रविण अष्टीकर यांच्यासह महापालिकेतील सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, 1997 मध्ये मोशी, चिखलीसह हा भाग महापालिकेत समाविष्ट झाला. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी दूरदृष्टी ठेवून वाढत्या नागरिकरणाचा विचार करून आंध्रा-भामा धरणातील पाणी आणण्याचे नियोजन केले नाही. त्यावेळी नियोजन केले असते तर कदाचीत वीस वर्षापूर्वीच आंध्रा-भामा धरणाचे पाणी उपलब्ध झाले असते. राज्य सरकारमधील जलसंधारण मंत्री गिरीष महाजन यांनी हे पाणी मंजूर करून दिले. परंतु, ज्यावेळी आंध्रा-भामा धरण तयार झाले. त्यावेळी तत्कालीन सरकारने धरणग्रस्तांचे पुनर्वसन केले नाही. त्यामुळे तेथील अन्याग्रस्त स्थानिक शेतक-यांचा विरोध होत आहे. तरी, उपलब्ध मंजूर कोट्यातील पाणी आणण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विचारमंथन झाले आहे. त्यातून धरणग्रस्त शेतक-यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने 60 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भामा-आंध्राचे पाणी येत्या कळामध्ये लवकरच उपलब्ध होईल, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असेही आमदार लांडगे म्हणाले.

तुम्हाला तुमच्या दारात पाणी देणार – आयुक्त हार्डीकर

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, वाढत्या नागरिकरणानुसार शहराचा विकास होऊ शकला नाही. परिणामी आज सुविधा अपु-या पडू लागल्या आहेत. विकासाची गती लोकसंख्यावाढीबरोबर नाही झाली तर अनधिकृतपणे विकास होत असतो. त्याचेच उदाहरण म्हणजे अनधिकृत नळ कनेक्शन आहे. आज शहरात पाण्याची चोरी होते. जर ही चोरी रोखली गेली तर या भागातील नागरिकांना पाण्याची कमतरता भासणार नाही. पाण्याची गळती रोखण्यासाठी नव्याने पाणी पुरवठा नलीका भूमिगत करत आहोत. गळती रोखल्यास तुम्हाला अपेक्षीत अतिरिक्त पाणी आजही पुरवठा करता येऊ शकतो. भामा-आंध्रा धरणातील पाणी येण्यासाठी अवधी लागला तरी हरकत नाही. परंतु, सध्या चोरी आणि गळती रोखल्यास तुमची पाण्याची मागणी पूर्ण होऊ शकते. हे पाणी उपलब्ध झाल्यास मोशी, चिखली, च-होली सर्वच भागातील सोसायट्यांना समांतर पाणी मिळेल, याची शास्वती आहे. शिवाय, टेल लाईनमुळे पाण्याचा प्रवाह मागे राहतो. भविष्यात तुम्हाला तुमच्या दारात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याचबरोबर चिखली ते च-होली-दिघी या इंद्रायणीच्या पट्ट्यातील सोसायट्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी या भागामध्ये दहा नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्याची योजना आणत आहोत. त्यामुळे पुढील वर्षी या भागातील परिस्थिती नक्कीच बदललेली असेल, असा विश्नास आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button