breaking-newsआंतरराष्टीय

भारतीय वैमानिकाची आज सुटका

जागतिक दबावापुढे पाकिस्तान झुकले; मात्र शांततेसाठी पाऊल टाकल्याची इम्रान यांची बतावणी

नवी दिल्ली / इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची शुक्रवारी सुटका करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे.

हे आमचे शांततेसाठीचे पहिले पाऊल आहे, असा कांगावा पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात अमेरिका, सौदी अरेबियासह काही देशांनी आणलेल्या दबावामुळे पाकिस्तानला ही सुटका करणे भाग पडल्याचे स्पष्ट होत आहे. भारतानेही ही सुटका म्हणजे तडजोड नसून जोवर अतिरेक्यांवर ठोस कारवाई करीत नाही तोवर पाकिस्तानशी चर्चा नाही, असा ठाम पवित्रा घेतला आहे.

विशेष म्हणजे उभय देशांचा तणाव निवळावा यासाठी आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावता आली, असे सूचक उद्गार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढल्याने भारत आणि पाकिस्तान प्रश्नात अमेरिकेने प्रथमच शिरकाव केला आहे. सौदी अरेबियाच्या राजदूतांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सौदीचे एक मंत्री तेथील राजपुत्रांचा खास संदेश घेऊन पाकिस्तानला रवाना झाले. या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी संरक्षणविषयक उच्चस्तरीय समितीची बैठक घेतली.

शांततेच्या प्रयत्नांचा एक भाग आणि भारतासमवेत चर्चेचे पहिले पाऊल म्हणून अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका करण्यात येणार आहे, असे इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत जाहीर केले. शुक्रवारी वाघा सीमेवरून अभिनंदन मायदेशी परतणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला कमालीचा तणाव निवळावा यासाठी पंतप्रधान इम्रान खान हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेला तयार आहेत, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच इम्रान खान यांनी सुटकेची ही घोषणा केली. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे सभागृहात भाषण करीत असताना इम्रान खान यांनी त्यांना मधेच थांबविले आणि अभिनंदन यांच्या सुटकेची अनपेक्षित घोषणा केली. खान यांच्या घोषणेचे पाकिस्तानातील लोकप्रतिनिधींनी बाके वाजवून जोरदार स्वागत केले. मात्र अभिनंदन यांची  सुटका बिनशर्त झाली पाहिजे, त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे भारताने गुरुवारी पाकिस्तानला ठणकावले होते.

अभिनंदन यांची सुटका हा उभय देशांतील तडजोडीसाठीचा मुद्दा होऊ शकत नाही, हे भारताने स्पष्ट केले. अभिनंदन यांना थोडीदेखील इजा होता कामा नये, असेही भारताने बजावले होते.

सौदीच्या हालचाली..

विशेष म्हणजे सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री आदिल अल् झुबेर हे सौदी राजपुत्र महम्मद बिन सलमान यांचा महत्त्वाचा निरोप घेऊन गुरुवारीच पाकिस्तानात आले. त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांची भेट घेतली. त्याचवेळी सौदी अरेबियाच्या भारतातील राजदूतांनी मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे अभिनंदन यांच्या सुटकेमध्ये सौदी अरेबियानेही महत्त्वाची भूमिका पार पाडल्याची चर्चा आहे.

 ‘आधी कारवाई करा, मगच चर्चा’

या घडीला पाकिस्तानशी कोणत्याही चर्चेची आमची तयारी नाही. प्रथम आम्ही दिलेल्या माहितीवरून त्यांनी त्यांच्या देशातील भारतविरोधी अतिरेकी गटांवर कारवाई करावी, असे भारताने बजावले आहे.

अमेरिकेचा शिरकाव..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सकाळी हनोई येथे भरगच्च पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच भारत-पाकिस्तानातील तणावाला स्पर्श केला. ते म्हणाले, ‘‘भारत आणि पाकिस्तानातील तणाव ज्यायोगे कमी होईल, अशी एक चांगली बातमी आहे. उभय अण्वस्त्रसज्ज देशांतील तणाव दूर व्हावा यासाठी घडत असलेल्या या गोष्टीकरिता आमचाही सहभाग होता, याचा आनंद वाटतो!’’ विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेसाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणल्याचेच ट्रम्प यांनी यातून सूचित केले. मात्र भारताचे हित साधून देताना अमेरिकेने एक प्रकारे भारत-पाकिस्तान आणि काश्मीर या प्रकरणात शिरकावच केला आहे. काश्मीर हा उभयपक्षी प्रश्न असून त्यात अमेरिकेचा संबंध नाही, अशी भूमिका घेत प्रत्येक सरकारने आजवर अमेरिकेचा मध्यस्थीचा प्रयत्न धुडकावला होता.

कारवाईचे पुरावे आहेत..

बालाकोट येथे भारतीय वायुदलाने केलेल्या धडक कारवाईचे पुरावे आहेत, मात्र ते उघड करायचे की नाहीत आणि कधी करायचे हे राजकीय नेतृत्वाने ठरवायचे आहे, असे  एअर व्हाईस मार्शल आर जी के कपूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. या कारवाईत नेमके किती अतिरेकी मारले गेले, याची आकडेवारी मात्र त्यांनी जाहीर करण्यास नकार दिला. पाकिस्तानने भारतीय लष्करी आस्थापनांवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. आपण एफ-१६चा वापर केला नाही, असा पाकिस्तानचा दावा होता. मात्र आम्ही पाकिस्तानचे हे लढाऊ विमान पाडल्याचे कपूर म्हणाले. या विमानाचे तुकडेही त्यांनी दाखवले. अभिनंदन यांच्या सुटकेविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button