breaking-newsमहाराष्ट्र

भाजप सरकारला उखडून फेकण्यासाठी एकत्र व्हा – चंद्रशेखर आझाद

देशात संवैधानिक अधिकारांची गळचेपी सुरू आहे. भाजप सरकारला उखडून फेकण्यासाठी दलित, मुस्लीम, बहुजनांना एकजूट व्हावे लागणार आहे. मत आमचे सरकार तुमचे, हे आता चालणार नाही. येत्या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांना मतदान करू नका, असे आवाहन भीम आर्मीचे संस्थापक अ‍ॅड. चंद्रशेखर आझाद यांनी येथे बोलताना केले.

चंद्रशेखर आझाद यांची महाराष्ट्रातील पहिली सभा येथील सायन्स कोर मैदानावर झाली. यापूर्वी मुंबई आणि पुण्यासह तीन सभांना परवानगी नाकारण्यात आली होती. आझाद यांनी आपल्या खास शैलीत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामान्य कार्यकर्ते आहोत. न्यायासाठी आपली लढाई आहे. संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन  होताना पाहून आपण चूप बसू शकणार नाही. दलित, बहुजन, मुस्लिमांवर अत्याचार होत असतील, तर पुन्हा भीम आर्मीला आपले खरे रूप दाखवावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

भाजप नेत्यांचे दुहेरी मापदंड आहेत. जेव्हा देशाच्या बाहेर जातात, तेव्हा आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो असल्याचे सांगतात आणि भारतात परतल्यानंतर ‘राम मंदिर वही बनेगा’चा नारा देतात. त्यांना मृतदेहांवर राजकारण करायचे आहे. पण, आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही. संविधान आणि मनुस्मृतीची ही लढाई आहे, असे आझाद म्हणाले.

दलित मतांचे राजकारण करणाऱ्या पक्षांवरही आझाद यांनी टीका केली. ते म्हणाले, हे लोक परजीवी आहेत. आपल्या मतांवर ते जिवंत आहेत. आपण त्यांना मत देणे बंद केले, तर ते रस्त्यावर येतील. त्यांची आपोआप राजकीय नसबंदी होईल. राजकीय आरक्षणामुळे प्रश्न सुटलेले नाहीत. एस.सी., एस.टी. राखीव जागांवरून निवडून जाणारे लोकप्रतिनिधी संसदेत आपले प्रश्न व्यवस्थित मांडत नाहीत, हे आता लक्षात आले आहे, त्यामुळे सर्वसामान्य जागांवरही अनुसूचित जाती-जमातींच्या उमेदवारांना लढवून त्यांना विजयी बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आता आपल्याला संसदेवर निळा ध्वज फडकवायचा आहे, असे आझाद म्हणाले.

आझाद यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, योगी आदित्यनाथ ढोंगी आहेत. दोन वर्षांमध्ये एकही दंगल झाली नसल्याचे ते सांगत आहेत, पण त्यांच्याच कार्यकाळात झालेल्या दंगलीमुळे चंद्रशेखर आझाद या कार्यकर्त्यांचा जन्म झाला आहे. त्यांनी पुन्हा दंगली घडवल्या, तर अनेक चंद्रशेखर आझाद जन्म घेतील. भीम आर्मीचे   कार्यकर्ते संपूर्ण देशभर आहेत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना धक्का लावू नका. देश संविधानानुसार चालतो. तुम्ही त्याचे पालन करीत नसाल, तर आम्ही तुमची खुर्ची काढून घेऊ, असे आझाद म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button