breaking-newsराष्ट्रिय

भाजप म्हणजे राजकीय शार्क – टीडीपी

अमरावती – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) भाजपवरील टीकेचे सत्र चालूच ठेवले आहे. टीडीपीने आता भाजपचा उल्लेख राजकीय शार्क म्हणून केला आहे.

भाजपचे रूपांतर राजकीय शार्क माशात झाले आहे. छोट्या माशांना (पक्ष) गिळंकृत करून स्वत: जगण्याचा प्रयत्न त्या शार्कने चालवला आहे, असे टीकास्त्र टीडीपीचे ज्येष्ठ नेते आणि आंध्रचे अर्थमंत्री यनामला रामकृष्णूडू यांनी सोडले. तामीळनाडूतील अण्णाद्रमुक, पश्‍चिम बंगालमधील तृणमूल कॉंग्रेस, दिल्लीतील आप, बिहारमधील जेडीयू आणि टीडीपी या सत्ताधारी पक्षांना भाजप कशी वागणूक देत आहे ते देशातील जनता पाहत आहे, असे त्यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले. केंद्रात स्वबळावर पुढील सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत कुठलाही राष्ट्रीय पक्ष नाही.

सरकार स्थापनेसाठी राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्यावरच विसंबून राहावे लागेल. मात्र, प्रादेशिक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना दुबळे बनवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची खेळी राष्ट्रीय पक्ष करत आहेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. लोकशाही आणि संघराज्यीय व्यवस्था वाचवण्यासाठी प्रादेशिक पक्षांचा एकत्रित निवडणुकांना विरोध असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

दरम्यान, एकत्रित निवडणुकांना विरोध करून टीडीपीने कोलांटउडी मारल्याचे मानले जात आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा टीडीपी घटक असताना चंद्राबाबूंनी फेब्रुवारी 2017 मध्ये एकत्रित निवडणुकांच्या संकल्पनेला जोरदार पाठिंबा दर्शवला होता. निवडणुकांची चिंता न करता विकासाकडे लक्ष केंद्रित करता येऊ शकते, अशा शब्दांत त्यांनी ती संकल्पना उचलून धरली होती. मात्र, आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास मोदी सरकारने नकार दर्शवल्याने टीडीपी काही महिन्यांपूर्वी एनडीएमधून बाहेर पडला. त्यानंतर टीडीपीने मोदी सरकार आणि भाजपच्या विरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button