breaking-newsराष्ट्रिय

भाजपच्या राजवटीत निवडणूक आयोग, रिझव्‍‌र्ह बँक, न्यायव्यवस्था यांच्या चिंध्या!

  • काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका

निवडणूक आयोग, रिझव्‍‌र्ह बँक, न्यायव्यवस्था यांच्या भाजप सरकारच्या काळात चिंध्या करण्यात आल्या. लोकशाहीचे रक्षण  करणाऱ्या संस्थांवर आघात करण्यात आले अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. २०१४ पूर्वी देशाचा विकासच झाला नाही असा दावा करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी उद्दामपणा करीत काँग्रेसचाच नव्हे तर देशातील जनतेचा अपमान केला आहे असे  सांगून ते म्हणाले की, सत्तर वर्षांत देशामध्ये विकास झाला नाही असे जर मोदी म्हणत असतील तर तो प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. भारताने जगाला भविष्याची दिशा दाखवली आहे, त्यात काँग्रेसचा वाटा आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा तो दावा खोटा व अपमानास्पद आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या सदस्यांपुढे ते बोलत होते.

सध्या दलित , शेतकरी, आदिवासी, अल्पसंख्याक यांना तुम्हाला काही मिळणार नाही असे सांगितले जाते त्यावर आवाज उठवला तर त्यांना मारहाण केली जाते असे चित्र आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी सौम्य केल्या गेल्या, अनुसूचित जाती जमातींच्या शिष्यवृत्त्या काढून घेण्यात आल्या. जात व धर्माच्या नावाने देशात भेदभाव सुरू आहे. वंचितांचा विश्वासघात चालू असून अनिल अंबानी यांना फायदा दिला  जात आहे, असे सांगून ते म्हणाले की, भाजपप्रणीत सरकारने राफेल विमानांचा करार केला, देशात पन्नास वर्षे विमाने उत्पादन करणाऱ्या एचएएलला विमान उत्पादनाचे कंत्राट देण्याऐवजी कराराच्या १९ दिवस आधी स्थापन केलेल्या कंपनीला कंत्राट देण्यात आले.  कुणाला काही मिळणार नाही, केवळ अंबानींना मिळेल,  त्यांच्यावर ४५ हजार कोटींचे कर्ज आहे. ते भरून काढण्यासाठी त्यांना राफेल विमानांचे कंत्राट देण्यात आले. यूपीए राजवटीत विमानांची किंमत कमी होती ती भाजप सरकारच्या करारात अचानक वाढली त्याचे कारण अनिल अंबानी यांना फायदा व्हावा हेच होते.

जेव्हा कर्नाटक व तेलंगणाचा शेतकरी कर्जमाफी मागतात तेव्हा पंतप्रधान ते आमच्या धोरणात बसत नाही असे सांगतात, पण भारतातील मूठभर श्रीमंत उद्योगपतींनी १२.५ कोटी रुपयांची अनुत्पादक मालमत्ता तयार केली आहे. त्याचे त्यांना काही वाटत नाही. भाजपचाच आमदार महिलेवर बलात्कार करतो व निरव मोदी लोकांचा पैसा घेऊन पळून जातो तेव्हा मोदी शांत बसतात. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, रिझर्व बँक यांच्या सरकारने चिंध्या केल्या आहेत. देशात प्रथमच सर्वोच्च न्यायालयाचे चार वरिष्ठ न्यायाधीश त्यांना काम करू दिले जात नसल्याचे जाहीरपणे पत्रकार परिषदेत सांगतात ही वाईट लक्षणे आहेत. पंतप्रधानांविरोधात मी वाईट शब्द वापरले नाहीत पण जर तुम्ही राफेल करारावर संसदेतील चर्चा पाहिली असेल तर पंतप्रधान माझ्या एकाही प्रश्नाला उत्तर देऊ शकलेले नाहीत अशी टीका करून ते म्हणाले की, चीनमध्ये दिवसाला ५० हजार रोजगार निर्माण होतात पण भारतात दिवसाला ४५० रोजगार निर्माण होतात त्यामुळे रोजगारी हा गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांना मदत हवी आहे. युवकांना शिक्षण तर वृद्धांना आरोग्य सेवा हवी आहे, पण त्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button