breaking-newsमहाराष्ट्र

भाजपचा पराभव शिवसेनेच्या पथ्यावर

मुंबई – पाच राज्यांतील भाजपचा पराभव हा राज्यात शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असून युतीसाठी विनवण्या करणारा भाजप आता नरमाईची भूमिका घेईल आणि शिवसेनेला विधानसभेसाठी हव्या असलेल्या जागा मागण्याची संधी मिळेल, असे सांगण्यात येते.

तसेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या दुय्यम वागणुकीचा वचपा काढण्याची संधीही शिवसेनेला मिळणार आहे.

स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेने २०१८ च्या आरंभी जाहीर केला. पण गेल्या दोन महिन्यांत राम मंदिर, हिंदुत्व या मुद्दय़ांवर भाजपबरोबर पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय खुला केला आहे. मात्र, अधिकृतपणे कोणतीच भूमिका जाहीर करण्याबाबत मौन बाळगले आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थानचा काय निकाल लागतो, याकडे शिवसेनेचे लक्ष होते. छत्तीसगढ आणि राजस्थानमध्ये भाजपचा पराभव झाला. तर मध्य प्रदेशात त्रिशंकू विधानसभेचे चित्र आहे. तेथेही भाजपला फटका बसला आहे. या निकालानंतर शिवसेनेची भूमिका आणि युतीचे महत्त्व भाजपसाठी कळीचे ठरणार आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपमध्ये सहमती होती. मात्र, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. भाजपने शिवसेनेपेक्षा जवळपास दुप्पट जागा जिंकून सरकार स्थापन केले. त्यामुळे शिवसेनेला विधानसभा जागावाटपाची चिंता होती. तीन राज्यांमध्ये भाजपची पीछेहाट झाल्याने सन्मानपूर्वक आणि मनाप्रमाणे जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रह धरू शकते.

बिहारमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या जागा जिंकणाऱ्या नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाला भाजपने निम्म्या जागा दिल्या होत्या. त्यातुलनेत शिवसेनेची परिस्थिती चांगली असल्याने विधानसभेसाठी दोन्ही पक्षांना निम्म्या म्हणजेच प्रत्येकी १४४ जागांचा आग्रह शिवसेना धरू शकते. सध्याचे राजकीय चित्र पाहता भाजपही त्यास तयार होण्याची शक्यता आहे.

अर्थात युतीसाठी तयार होण्यापूर्वी शिवसेनेचे लक्ष भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भूमिकेकडे आणि वागणुकीकडे असेल. आपल्याला सन्मानाची वागणूक मिळावी असा शिवसेनेचा आग्रह असेल.

काही मुद्दय़ांवर कधीच तडजोड होऊ शकत नाही. त्यात शेतमालाला चांगला भाव, स्थानिकांनारोजगार, देशपातळीवर हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्दय़ांचा समावेश आहे. देशाच्या अस्मितेबाबतही शिवसेनेची प्रखर भूमिका आहे. त्यामुळे या सर्वाचा विचार करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील.

– नीलम गोऱ्हे, प्रवक्ता, शिवसेना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button