breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपकडून 28 महिन्यात 42 वेळा ‘महासभा तहकूबीचा विक्रम’

  • दोन्ही महापाैरांच्या कार्यकाळात सर्वसाधारण सभा तहकूबीचा सपाटा
  • लोकहिताच्या कामांना बसतेय खीळ, सभा ऐकण्यास आलेल्या नागरिकांकडून संताप

विकास शिंदे 

पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  देशभरासह पिंपरी चिंचवडमधील मान्यवरांना श्रध्दांजली अर्पण करुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्याचा सपाटा सत्ताधारी भाजपने लावला आहे. मागील 28 महिन्याच्या कालावधीत 42 वेळा महासभा तहकूब करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आतापर्यंत 33 सर्वसाधारण सभेच्या “तारीख पे तारीख’मुळे लोकहितांच्या कामांना खीळ बसू लागली आहे. दरम्यान, महापालिका सर्वसाधारण सभा ऐकण्यास आलेल्या नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जूलै महिन्याच्या तहकूब सभेचे आज ( गुरुवारी) आयोजन केले होते. महापौर राहूल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या सुचनेवरुन दिल्लीच्या पंधरा वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शीला दीक्षित, पिंपळे गुरवमधील अडीच वर्षाच्या मुलगी, पिंपरीतील मृत हितेष मुलचंदानी यांच्यासह अनेक मान्यवरांना सभेत श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सत्ताधा-यांनी 20 ऑगस्टपर्यंत सभा तहकूब करण्याची सूचना मांडली. त्याला उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी विरोध केला. त्यामुळे पक्षनेते एकनाथ पवार यांनी तहकुबीचा कालावधी कमी करण्याचा सुचना मांडल्यावर जूलै महिन्याची तहकूब सभा 6 आॅगस्ट दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. महापालिकेची 14 मार्च 2017 रोजी पहिली सभा होवून नवीन सभागृह अस्तित्वात आले. मात्र, सभेच्या कामकाजाबाबत सत्ताधाऱ्यांची उदासिनता दिसून येत आहे. मागील 28 महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत 33 मासिक सभा झाल्या. सभा तहकुबीच्या सपाट्यामुळे 42 वेळा सभा तहकूब करण्यात आल्या. मान्यवरांना श्रध्दांजली म्हणून काही मिनिटे सभा तहकूब करुन पुन्हा सभेचे कामकाज सुरु करणे अपेक्षित असताना पंधरा दिवस ते एक महिना अशा सभा पुढे ढकलण्यात येत आहेत.

तसेच महापालिकेतील अनेक वादग्रस्त प्रस्तावांवरील चर्चा टाळणे, प्रस्तावांची “सेटींग’, करणे, पक्षांतर्गत राजकारण करुन गटबाजी करणे, विरोधी गटाचे प्रस्ताव हाणून पाडणे, महापालिका प्रशासनावर दबाव टाकणे, कोणत्याही कारणास्तव अधिका-यांना वेठीस धरणे, लोकहिताच्या कामांवर चर्चा न करता विषयांना ठरवून मंजुरी देणे, पक्षातील नगरसेवकांना भाऊ-दादांची नावे घेवून अनेक विषय रेटून टाकणे, धोरणात्मक निर्णय घेवूनही त्याची अमंलबजावणी न करणे, आदींसाठी सभा तहकुबीचे राजकारण केले जात आहे. सत्ताधारी भाजपचे तत्कालीन महापाैर नितीन काळजे यांच्या कार्यकाळात 24 आणि विद्यमाना महापाैर राहूल जाधव यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात 18 महासभा तहकुब केलेल्या आहेत. या सभा तहकूबीमुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रस्तावांवरील निर्णय लांबणीवर पडत आहेत. तसेच शहराच्या विकास कामांना खीळ बसू लागली आहे.

 

दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली, आदरांजली वाहिली पाहिजे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारणच नाही. परंतु, शहरात कच-यासह विविध गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. भाजप पदाधिका-यांनी जबाबदारीचे भान ठेवून या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ही सभा अधिक काळ तहकूब करणे योग्य नाही. ही भूमिका माझी आहे., अशी भूमिका उपमहापाैर सचिन चिंचवडे यांनी मांडली. 

——————– 
शहरातील कचरा प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी सभागृहाची आहे. परंतु, दिवंगत मुख्यमंत्री शिला दिक्षित यांच्यासाठी सभा तहकूब केली नाही, असा आरोप आमच्यावर होवू नये म्हणून, सभा तहकूब करण्यात आली. सभेपूर्वी विरोधी नगरसेवकांनी तशी चर्चा करून सूचना केल्याने सभा तहकूब केली. तसेच, नगरसेवकांच्या सुचनेनुसार तहकुबीचा कालावधी कमी करून ती लवकर घेण्यात आलेली आहे. असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button