breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भंडाऱ्यातील सरकारी रुग्णालयात आग, १० नवजात चिमुकल्यांचा मृत्यू

भंडारा – भंडाऱ्यात देश हादरवणारी घटना घडली आहे. सर्वजण साखरझोपेत असताना भंडाऱ्यात दहा नवजात बालकांनी आपला जीव गमावला. भंडाऱ्याच्या जिल्हा रुग्णालयातील शिशु केअर युनिटला आज मध्यरात्री भीषण आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात असून धुरामुळे गुदमरुन बाळांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचे रुग्णालयात असलेल्या नर्सच्या निदर्शनास आले. तेव्हा नर्सने दार उघडून पाहिले असता सगळीकडे प्रचंड धूर झाला होता. तेव्हा याबाबत तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली. अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले. रुग्णालयातील लोकांनीही यावेळी मदतकार्यात सहकार्य केले. दरम्यान, अतिदक्षता विभागात आऊटबॉर्न आणि इनबॉर्न अशी दोन युनिट आहेत. त्यापैकी मॉनिटरमध्ये असलेल्या ७ बालकांना वाचवण्यात यश आले. तर आऊटबॉर्न युनिटमधील १० नवजात चिमुकल्यांचा दूर्दैवी मृत्यू झाला.

या हृदयद्रावक घटनेनंतर रुग्णालयाबाहेर आरडाओरडा सुरू झाला. मयत बालकांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. तर रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकही झाली आहे. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालय प्रशासनाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करुन अन्य रुग्णांना दुसरीकडे हलवण्याच्या आणि लागेल ती मदत पुरवण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button