breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बिर्ला केंद्राची जागा देण्यास सेनेचा विरोध मावळला

गिरगाव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्रामधील जागा जल पर्यटनासाठी उभारण्यात येणाऱ्या धक्क्यासाठी देण्यास शिवसेनेने कडाडून विरोध केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचा विरोध मावळला असून बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेत कलादालन उभारण्यावर तडजोड करीत शिवसेनेने आपला विरोध सोडून दिला आहे.

राज्य सरकारने गिरगाव चौपाटी येथे मनोरंजन केंद्र उभारण्यासाठी तेथील ६,४७२.७६ चौरस मीटर जागा पालिकेला दिली होती. प्रतिवर्ष १ रुपया नाममात्र भुईभाडय़ाने ही जागा पालिकेला ९९ वर्षांसाठी देण्यात आली. या भूखंडावरील २,७९१.४४ चौरस मीटर जागेवर बिर्ला क्रीडा केंद्राचे कार्यालय, सभागृह, तालीम कक्ष उभारण्यात आले. उर्वरित जागेत गच्ची बगीचा व उपाहारगृह उभारण्यात आले.

केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने मुंबई बंदर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याची योजना आखली असून मुंबई पोर्ट ट्रस्ट त्याचा आराखडा तयार करीत आहे. या प्रकल्पातील एक भाग म्हणून गिरगाव चौपाटीवर बहुउद्देशीय धक्का (जेट्टी) बांधण्याचा मानस आहे. यासाठी बिर्ला क्रीडा केंद्रातील ५०० चौरस मीटर जागा द्यावी असे राज्य सरकारकडून पालिकेला कळविण्यात आले आहे. मात्र पालिका निवडणुकीदरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपावरून संघर्ष झाला. दरम्यानच्या काळात सुधार समितीमध्ये बिर्ला क्रीडा केंद्राची जागा धक्क्यासाठी देण्याबाबत दोन वेळा सादर झालेला प्रस्ताव शिवसेनेने विरोध करीत फेटाळून लावला होता. आता सुधार समितीत पुन्हा हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या युतीच्या पाश्र्वभूमीवर या प्रस्तावास असलेला शिवसेनेचा विरोध मावळला आहे.

एकेकाळी बिर्ला क्रीडा केंद्रातील सभागृहात मराठी, गुजराती, हिंदी नाटकांचे प्रयोग होत होते. मात्र १९ वर्षांपूर्वी हे सभागृह बंद पडले. पालिकेने या केंद्राच्या उभारणीबाबत कोणती भूमिका घेतली आहे, अशी विचारणा माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केली. तर धक्का उभारताना अत्याधुनिक असे कलादालन आणि सभागृहही उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अतुल शाह, काँग्रेसचे नगरसेवक अश्रप आझमी यांनी केली. बिर्ला क्रीडा केंद्राची पाहणी केल्यानंतरच धक्क्याला जागा देण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनंत नर यांनी केली. अखेर सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी या संदर्भात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

या संदर्भात पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी ७ जुलै रोजी सादरीकरण करणार असून या बहुउद्देशीय धक्क्यामुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button