breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईचा वेग मंदावला! दुसऱ्या दिवशीही पाऊसहाल

दुसऱ्या दिवशीही पाऊसहाल

मुंबई परिसराला शुक्रवारी झोडपून काढणाऱ्या पहिल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी ओसरला, परंतु ठिकठिकाणी घडलेल्या पडझडीच्या दुर्घटना, संथगतीने सरकणारी वाहतूक, उशिराने धावणारी रेल्वेसेवा यामुळे महानगराचा वेग मंदावला. ठाण्यात विजेच्या धक्क्य़ाने दोघांचा मृत्यू झाला, तर मुंबईत देवनार येथे घराची भिंत कोसळून दोघे जखमी झाले.

देवनार येथे भीम सेवा संघ चाळीतील घराची भिंत कोसळून लखन ठाकूर (१८) आणि रमेश लोखंडे (३०) जखमी झाले. त्यांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने काही वर्षांपूर्वी कुर्ला पश्चिम येथील शकिना मंझिल इमारत अतिधोकादायक घोषित केली होती. या इमारतीचा काही भाग शनिवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास एका दुकानावर कोसळला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्यात आल होता. तरीही या इमारतीमध्ये ३० कुटुंबे वास्तव्यास होती. घाटकोपर पश्चिम येथील जागृतीनगर मेट्रो स्थानकाजवळ एकवीरा दर्शन सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत काही मोटारगाडय़ांचे नुकसान झाले.

ठाण्यात पावसाचा जोर, दोघांचा मृत्यू

ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या शहरांबरोबरच जिल्ह्य़ाच्या अनेक भागांमध्ये शनिवारी दुपापर्यंत पावसाचा जोर कायम होता. या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे ४८ तक्रारी आल्या. जोरदार पावसामुळे ठाणे शहरात गेल्या ३२ तासांत ३९ वृक्ष उन्मळून पडले. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. मध्ये रेल्वे १५ ते २० मिनीटे उशिराने धावत होती. ठाण्याच्या कोलबाड भागात नागेश निरंगे (४६) यांचा शेलार पाडा भागात विद्युत वाहिनीवर पडलेले झाड बाजूला करताना, तर अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडय़ात विष्णू सोलंकी (२१) या रिक्षाचालकाचा विजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला.

भाईंदरमधील काशिमीरा येथे तबेल्यात काम करणाऱ्या हरिवंश अभयराज यादव यांचा शुक्रवारी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मात्र मृत्यूचे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

वागळे ईस्टेट, वर्तकनगर, कोपरी, खोपट, रघुनाथ नगर, नौपाडा, माजीवडा, खारकर आळी, तीनहात नाका, घोडबंदर तर कळव्यामधील पारसिक नगर, तसेच मुंब्रा येथील एकता नगर आणि शीळ गाव या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली. ठाणे स्थानक परिसर, नितीन जंक्शन या परिसरात सकाळी काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मुसळधार पावसामुळे शनिवारी पहाटे लोकमान्य नगर, कोपरी, कळवा भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता.

तीन हात नाका, वर्तकनगर, रघुनाथ नगर, नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी आणि राबोडी भागांत झाडे उन्मळून पडली. पाचपाखाडी येथे झाड पडून एका दुचाकीचे नुकसान झाले. राम मारूती रोडपासून मासुंदा तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर  शनिवारी सकाळी मोठा वृक्ष कोसळला. परिणामी हा मार्ग काही काळ वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. खोपट येथील आंबेडकर रोडजवळ एका नाल्याजवळील संरक्षक भिंत कोसळली. घोडबंदर येथील आनंद नगर भागात रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे प्रवाशांना या मार्गावरून प्रवास करण्यात अडथळा निर्माण झाला.

घोडबंदर, भिवंडीत विजपुरवठा खंडीत

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे घोडबंदर येथील वाघबीळ भागातील कॉसमॉस रिजन्सी संकुलाचा वीजपुरवठा शुक्रवार सकाळपासून खंडीत झाला होता. महावितरणाच्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने संकुलातील १८५ कुटुंबांना त्रास सहन करावा लागला. संकुलातील विद्युतपुरवठा शनिवारी रात्री सुरळित झाला. त्याचबरोबर भिवंडी शहरीभागासह ग्रामीण भागातही काही काळ वीजपुरवठा खंडीत झाल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.

मुंबई-ठाणे पाऊसनोंद : सांताक्रूझ येथे दुपारी ४.३० वाजेपर्यंत ६९.२ मि.मी., तर कुलाबा येथे ४६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात गेल्या २४ तासांत २९१.७ मिमी पावसाची नोंद झाली

मदतीला धावले पण..

ठाण्यातील कोलबाड भागात उन्मळून पडलेल्या झाडावरील विद्युत वाहिनी हटवण्यासाठी गेलेल्या राबोडी येथील रॉबर्ट चाळीतील रहिवासी नागेश निरंगे यांचा शुक्रवारी मध्यरात्री वीजेच्या धक्क्य़ाने मृत्यू झाला. कोलबाड येथील शेलार पाडा भागातील विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी निरंगे झाडाजवळ गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दुसरी दुर्घटना अंबरनाथची आहे. तेथील दुर्गादेवी पाडय़ात राहणारे रिक्षाचालक विष्णू सोलंकी शुक्रवारी रात्री १०च्या सुमारास शिवाजी चौकातील रिक्षा थांब्यावर प्रवाशांची वाट पाहत होते. त्याचवेळी एक झाड रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या रिक्षा थांब्याच्या लोखंडी छप्परावर कोसळले. त्यामुळे तेथील विद्युत वाहिन्या तुटल्या. विद्युत प्रवाह लोखंडी खांबात उतरल्याने धक्का लागून सोलंकी जखमी झाले. त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

वीज पडून राज्यात पाच मृत्युमुखी

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात शनिवारी काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्य़ातील उमरी तालुक्यातील हातणी येथे वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ातील नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यांत वादळी पावसात वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. तर बुलढाणा जिल्ह्य़ातील खामगाव तालुक्यात विहीर खचून एकाचा मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button