breaking-newsमहाराष्ट्र

प्लास्टिक बंदी काळाची गरज -रामदास कदम

प्लास्टिकमुळे नद्यांचे प्रदूषण होण्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्लास्टिक बंदी काळाची गरज बनली. प्लास्टिक निर्मूलनाचा प्रश्न संपूर्ण विश्वाला भेडसावत आहे. या पार्श्वभूमीवर देशात प्लास्टिक बंदीचा पहिला निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यास लोकप्रतिनिधी, प्रशासन व जनतेनेही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समाधान  राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

श्री क्षेत्र पुसेगाव (ता. खटाव) येथील सेवागिरी यात्रेनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शन व पशुसंवर्धन विभागाने सुरु केलेल्या चारा साक्षरता अभियानाचे उद्घाटन मंत्री कदम यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, की स्थानिक स्वराज्य संस्थांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, तसेच कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभे करावेत. प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार अमलात आणावेत. राज्यातील तलावांच्या दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी दिला आहे. पुसेगाव लगत असलेल्या ब्रिटिशकालीन नेर तलावाच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये निधी दिला जाईल.

आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, की पर्यावरणाच्या बदलामुळे पाऊस कमी पडत आहे. पर्यावरणाकडे लक्ष देणे ही गरज बनली आहे.

सांडपाण्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांनीही आता कमी पाण्यात जास्त उत्पन्न  घ्यायला हवे. जे पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचा योग्यरीत्या वापर व्हायला हवा.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, की प्लास्टिकमुळे मानवी जीवन धोक्यात आले होते. हे जीवन वाचविण्यासाठी प्लास्टिक बंदीचा शासनाचा निर्णय अतिशय चांगला आहे. जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे काम प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, की सातारा शूरांचा, संतांचा जिल्हा आहे. सेवागिरी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेवागिरी देवस्थान न्यासाचे काम सुरू आहे.

आमदार जयकुमार गोरे म्हणाले, की प्लास्टिक बंदी काळाची गरज असून, राज्य शासनाने प्लॅस्टिकवर आणलेली बंदी महत्त्वाची आहे. भविष्यात महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त होईल. प्रास्ताविक सेवागिरी देवस्थान न्यासाचे अध्यक्ष सुरेशराव जाधव यांनी केले.

पंचायत समितीच्या सभापती कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे यांच्यासह स्थानिक नेते, विविध संस्थांचे पदाधिकारी व भक्तगण उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button