breaking-newsपिंपरी / चिंचवड

प्राधिकरण इमारतीमधील ‘स्कॅनर’सह ‘टच स्क्रिन’मशीनही बंद

पिंपरी –  पर्यावरणपूरक इमारत असलेल्या प्राधिकरणाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पीएमआरडीए, कंपनी नोंदणी कार्यालय आणि प्राधिकरणाचे प्रशासकीय कामकाज चालते. त्यामुळे या कार्यालयामध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. या इमारतीमध्ये सुरक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून बसविण्यात आलेले ‘बॅगेज स्कॅनर’ गेल्या काही वर्षांपासून दुरुस्तीअभावी बंद आहेत. तसेच ‘टच स्क्रिन’ यंत्र बसविण्यात आले असून तेही बंदच आहे.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ सुसज्ज अशी पर्यावरणपूरक इमारत बांधली आहे. इमारतीमध्ये सात मजल्यांचे दोन विभाग आहेत. या दोन विभागांपैकी एका भागाच्या सात मजल्यांमध्ये प्राधिकरणाचे कामकाज चालते. तर दुसऱ्या भागातील दोन मजले केंद्र सरकारच्या कंपनी नोंदणी कार्यालयासाठी आणि चार मजले पीएमआरडीएला भाडय़ाने देण्यात आले आहेत.

या इमारतीतील वाढत्या गर्दीमुळे प्राधिकरणाची सुरक्षा यंत्रणाही तेवढीच मजबूत असणे आवश्यक आहे. मात्र, तशी यंत्रणा दिसत नाही. गेल्या काही वर्षांपासून नागरिकांकडील साहित्य तपासण्यासाठी बसविण्यात आलेले ‘बॅगेज स्कॅनर’ नादुरुस्त झाले आहे. परदेशी बनावटीचे स्कॅनर दुरुस्तीसाठी कारागीर मिळत नसल्यामुळे ते बंद आहे. इमारतीच्या वाहनतळामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर हे यंत्र बसविण्यात आले आहे. परदेशी कंपनीचे हे स्कॅनर २००२ मध्ये खरेदी करण्यात आले होते. मात्र, ते बंद पडल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी कारागीर मिळत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. याशिवाय प्राधिकरणामध्ये नागरिकांना त्वरित माहिती मिळण्यासाठी ‘टच स्क्रिन’ यंत्र बसविण्यात आले आहे. ते यंत्रही बंद असल्यामुळे नागरिकांना त्याचा कोणताही फायदा होत नाही.

सहा महिन्यांपूर्वी इमारतीच्या एका भागातील सातही मजले रिकामे होते. त्यानंतर पीएमआरडीए आणि कंपनी नोंदणी कार्यालयासाठी हा मजला भाडय़ाने देण्यात आला. कंपनी नोंदणी कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. सातव्या मजल्यावर प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांचे कार्यालय आहे.

प्राधिकरणाचे अध्यक्ष खाडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयामध्ये नियमित येण्यास सुरुवात केली आहे. खाडे यांच्या कार्यकर्त्यांचाही राबता वाढला आहे. तसेच पीएमआरडीए, कंपनी नोंदणी कार्यालयामध्ये कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याशिवाय दुसऱ्या मजल्यावर प्राधिकरणाचे उपाहारगृह आहे. तेथे तहसील कार्यालयात आणि बडोदा बँकेमध्ये आलेले नागरिकही येतात. त्यामुळे प्राधिकरणाच्या इमारतीत सतत नागरिकांची गर्दी असते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button