breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात गणपती बाप्पाचे जोरदार स्वागत

पुणे –  ‘गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ च्या जयघोषात आज संपूर्ण पुण्यात विघ्नहर्त्या गणेशाचं दिमाखात आगमन झालं. याशिवाय पुष्परथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री राजराजेश्वर मंदिरात दगडूशेठ हलवाई गणपतीचे विराजमान झाले. सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोरगाव येथील महान गाणपत्य श्री गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ.धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, दत्तोपंत केदारी,सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजूशेठ सांकला, माजी आमदार मोहन जोशी यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेल्या मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, मयूर बँड, प्रभात बँड, दरबार बँड, महिलांचे मानिनी ढोल-ताशा पथक यांसह शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर आणि नटराज शास्त्री गुरुजी यांनी केली.

अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात आली असून यामुळे भाविकांना सहजतेने दर्शन घेता येणार आहे, असं अशोक गोडसे यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button