breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

प्रदूषणकारी झगमगाटात वाढ

मुंबईत तीव्रता जास्त; झोपेवर परिणाम होण्याची शक्यता

गेल्या २० वर्षांत महाराष्ट्रातील प्रकाश प्रदूषणाच्या पातळीने ‘उच्च’हून ‘अत्युच्च’ पातळी गाठल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘अर्बन क्लायमेट जर्नल’मधील अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबईत प्रकाश प्रदूषण अधिक असून विकास प्रकल्प, औद्योगिक विकास आणि वायुप्रदूषणामुळे ते उग्र रूप धारण करू लागले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या झोपेवर दुष्परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हवा, पाणी आणि ध्वनी इतकी प्रकाश प्रदूषणाची चर्चा होत नाही. परंतु, गेल्या काही वर्षांत या प्रदूषणाविषयी सर्वसामान्यांमध्ये जाणीवजागृती होत आहे. गरज नसताना विद्युत दिव्यांचा केला जाणारा वापर या प्रदूषणाच्या मुळाशी आहे. कधी क धी हा प्रकाश इतका तीव्र असतो की तो भगभगीत वाटू लागतो. त्यात आता रात्रीच्या वेळी मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांपासून व्यावसायिक आणि पुरातन वास्तूंवरही केली जाणारी रोषणाई प्रकाश प्रदूषणात भर टाकत आहे. शहरातील विकास प्रकल्पांसाठी रात्री लावण्यात आलेल्या प्रखर दिव्यांमुळे ही समस्या अधिक तीव्र झाली आहे. १९९३ ते २०१३ या कालावधीत महाराष्ट्रातील प्रकाश प्रदूषणाने ‘अतिउच्च’ पातळी गाठल्याचे वास्तव एका अभ्यासातून समोर आले आहे. त्यापूर्वी ही पातळी ‘उच्च’ होती.

प्रकाश प्रदूषणासंबंधी पहिली तक्रार २०१७ मध्ये चिराबाजार येथील रहिवासी नीलेश देसाई यांनी केली होती. मरिन डाइव्हवर असणाऱ्या जिमखान्यांवरील प्रखर ‘फ्लड’ दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याचे देसाई यांनी म्हटले होते. यासंबंधीची तक्रार त्यांनी तहसीलदार आणि पोलिसांकडे केली होती. त्यावर वर्षभरानंतर कारवाई करत नोव्हेंबर २०१८ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विल्सन जिमखान्याला दिवे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र अजूनही जिमखाना प्रशासनाने दिवे न काढल्याची तक्रार देसाई यांनी केली. रात्री दहा वाजल्यानंतर दिवे बंद करण्याचे आदेश जिमखान्यांना असतानाही समारंभाच्या निमित्ताने रात्री ३ वाजेपर्यंत दिवे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केवळ जिमखान्यांवरील दिव्यांमुळे नाही. तर पालिकेने जुहू समुद्र किनाऱ्यावर केलेल्या रोषणाईमुळेही प्रकाश प्रदूषण होत असल्याचे वास्तव ‘आवाज फाउंडेश’च्या निरीक्षणातून समोर आले होते. या ठिकाणी साधारण १०० फूट उंचीवर बसविलेल्या एलईडी दिव्यांच्या प्रकाशाची तीव्रता ‘लक्स मीटर’च्या आधारे मोजण्यात आली होती. त्या वेळी ही तीव्रता ६७,००० लक्स म्हणजे जवळजवळ सूर्यप्रकाशाच्या समतुल्य होती. त्यानंतर पालिकेने मुंबईतील इतर किनाऱ्यांवर रोषणाई करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र त्यामुळे प्रकाश प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होणार असल्याचे ‘आवाज फाउंडेशन’च्या सुमैरा अब्दुलअली यांनी सांगितले. २००० साली पर्यावरण संरक्षण कायद्याअंर्तगत यासाठी वेगळी नियमावली तयार करण्यात आली असून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यावर अधिनियम करण्याची गरज असल्याचे अब्दुलअली यांनी सांगितले.सध्या दक्षिण मुंबईतील मेट्रोच्या बांधकामस्थळी लावलेल्या प्रखर दिव्यांमुळे प्रकाश प्रदूषण होत असल्याची तक्रार नीलेश देसाई यांनी केली आहे. यासंबंधीचे तक्रारपत्र मेट्रो प्रशासनाला पाठवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रकाश प्रदूषणाची समस्या तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे तज्ज्ञ डॉ. अभय देशपांडे यांनी सांगितले.

प्रकाश प्रदूषण म्हणजे..

‘रात्रीच्या काळोखावर कृत्रिम प्रकाशस्रोतांनी केलेले अतिक्रमण अशी प्रकाश प्रदूषण,’ अशा शब्दांत खगोल मंडळाचे तज्ज्ञ डॉ. अभय देशपांडे यांनी या समस्येची मांडणी केली. ते म्हणाले, ‘रस्त्यांवर झगमगणाऱ्या दिव्यांचा प्रकाश समांतर व वरच्या दिशेला जातो. तो धूलिकण, वाहन प्रदूषणाचे सूक्ष्म कण तसेच इतर कणांमुळे परावर्तित होऊन परततो, तेव्हा त्यास प्रकाश प्रदूषण असे म्हणतात. मानवी डोळ्यात कृष्णधवल दृष्टीसाठी ‘दंडपेशी’ आणि रंगीत दृष्टीसाठी ‘शंकुपेशी’ असतात. गुच्छिका पेशी या दिवस-रात्रीचे चक्र राखण्यास मदत करतात. कृत्रिम प्रकाशामुळे हे चक्र ढळते. त्यामुळे अनिद्रेचा विकार बळावू शकतो.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button