breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विकासक अद्याप मोकाट

टिळकनगर आग प्रकरण; उद्वाहन सुरू न झाल्याने रहिवाशांचे हाल

चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील एका इमारतीला २७ डिसेंबरला भीषण आग लागली होती. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला पंचवीस दिवस उलटूनही  टिळकनगर पोलिसांनी अद्यापही विकासकाला अटक केली नाही. तर या इमारतीमधील लिफ्टदेखील सुरू न झाल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टिळकनगरमधील गणेश गार्डनजवळ असलेल्या ३५ नंबरच्या सरगम सोसायटीच्या अकराव्या मजल्यावर ही आग लागली होती. बी विंगमधील एका घरात ही आग लागली होती. त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने चार घरांमध्ये ही आग पसरली होती.

विकासकाने १५व्या मजल्यावर असलेली आपत्कालीन स्थितीत उभी राहण्यासाठी बांधलेली जागा (रेफ्युजी एरिया) एका व्यक्तीला विकून त्या ठिकाणी अनधिकृतरीत्या भिंत बांधण्यात आली होती. त्यामुळे अनेकांना बाहेर पडताना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या आगीत सुनीता जोशी (वय ७२), भालचंद्र जोशी (वय ७२), सुमन श्रीनिवास जोशी (वय ८३), सरला गांगर (वय ८२), लक्ष्मीबेन गांगर (वय ८३) या पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या आगीच्या घटनेनंतर अद्यापही येथील रहिवाशांवर भीतीचे सावट असून विकासकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवासी करीत आहेत. तर या घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी विकासकावर गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर विकासकाने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयानेदेखील विकासकाचा अटकपूर्व जमिनीचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ विकासकाला अटक करावी, अशी मागणी रहिवासी करीत आहेत. तर ही इमारत रेरामध्ये नोंदणी केलेली नसल्याने मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेऊन संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक सोसायटीतील रहिवासी संदीप जोशी यांनी केली आहे.

रस्त्यावर अनधिकृत पार्किंग

टिळकनगर परिसरात वाहने पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यामुळे अनेक जण रस्त्यालगतच आपली वाहने पार्क करतात. परिणामी आगीच्या घटनेवेळी अग्निशमन दलाला या इमारतीपर्यंत पोहोचण्यास मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी या परिसरात अनेक वाहनांवर कारवाई केली. मात्र रहिवाशांकडूनच आम्हाला सहकार्य मिळत नसल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button