breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

लोकलमधील ‘लटकंती’चे ७११ बळी

धावत्या लोकलमधून पडलेल्यांची आकडेवारी जाहीर; २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये लक्षणीय वाढ

कधी गर्दीमुळे तर कधी जोरदार वारा अंगावर झेलण्यासाठी तर कधी उगाच स्टंटबाजी करण्यासाठी मुंबई लोकलच्या दारात उभे राहून प्रवास करणे प्रवाशांसाठी किती घातक ठरत आहे, हे सांगणारी आकडेवारीच रेल्वेने जाहीर केली आहे. धावत्या लोकलमधून पडून २०१८ या वर्षांत तब्बल ७११ प्रवाशांचा मृत्यू झाला तर, दीड हजारपेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. २०१७ मध्ये अशाच कारणामुळे ६५४ जणांना प्राण गमवावे लागले होते.

माहिती अधिकार कार्यकर्ते शकिल शेख यांनी मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील अपघातांसंदर्भात माहिती मागवली होती. रेल्वेकडून त्यांना देण्यात आलेल्या उत्तरानुसार २०१८ मध्ये रेल्वे मार्गावरील विविध अपघातांत २९८१ जणांचा मृत्यू तर ३३४९ जण जखमी झाले. रुळ ओलांडताना व गाडय़ांमधून होणाऱ्या अपघातांची संख्याच जास्त आहे. त्यातही लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांत २०१७ च्या तुलनेत वाढ झाली आहे. २०१८ मध्ये  ७११ जणांचा मृत्यू झाला. त्यात ७६ महिला व ६३५ पुरुषांचा समावेश आहे. जखमींची एकूण संख्याही १,५८४ पर्यंत आहे. २०१७ मध्ये लोकलमधून पडून झालेल्या अपघातांत ६५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

अपघातांना आळा बसावा यासाठी रेल्वे प्रशासनाने अनेक पर्याय शोधले. २०१५ मध्ये मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक सुनील सूद यांनी कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अप मार्गावरील प्रवासासाठी गर्दीच्या वेळेत लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवासास मुभा दिली होती. चढताना होणारा मनस्ताप व अन्य कारणांमुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. लोकल गाडय़ांच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग पश्चिम रेल्वेने केला. मात्र हा प्रयोग फसल्याने मध्य रेल्वेनेही त्यातून काढता पाय घेतला.

कार्यालयीन वेळांच्या बदलाचे भिजत घोंगडे

गर्दीच्या वेळी लोकल प्रवास सुकर व्हावा यासाठी सरकारी व खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्तावही मागेच पडला आहे. गेल्या चार वर्षांत यावर चर्चाच होत आहे. नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत एका उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर बोलताना कार्यालयांच्या वेळा बदलण्यासंदर्भात राज्य सरकारशी चर्चा सुरूच असल्याचे सांगितले. त्याला अनेकांकडून विरोधही झाला आहे. त्यामुळे कार्यालयीन वेळ बदलण्यासाठी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असे मतही गोयल यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button